पहलगाममध्ये सैनिक का नव्हते याचे उत्तर द्या, जितेंद्र आव्हाड यांचे सत्ताधाऱ्यांना आव्हान
पहलगाम येथील हल्ला हा देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे. पाकिस्तानच्या विरोधात जे युध्द करायचे आहे ते करा आम्ही तुमच्या सोबत आहोत. पण पहलगाम मध्ये सैनिक का नव्हते? याचे उत्तर द्या. हे आम्ही विचारात नाही आहोत कारण पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे नातेवाईक विचारत आहेत त्यांना उत्तर द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत केली. ते आज रत्नागिरीतील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी आले होते.
पत्रकार परिषदेत आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पहलगाम सारख्या ठिकाणी पर्यटकांवर हल्ला झाला.त्याठिकाणी सुरक्षेसाठी एकही सैनिक नव्हता. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचे नातेवाईकच विचारत आहेत की पहलगाम मध्ये सुरक्षा व्यवस्था का नव्हती? तिथे सैनिक का नव्हते? सरकार याचे उत्तर का देत नाही? हल्ल्यात जखमी झालेल्यांना मदतीसाठी आरोग्य यंत्रणा का पोहचली नाही. अडीच तास दहशतवादी हल्ला करत होते तेव्हा आपले सैनिक तिथे का पोहोचले नाहीत? आपल्या देशातील सैनिकांची संख्या दोन लाखाने का कमी झाली असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले की, आज बेरोजगारीवर कोण बोलत नाही, कायदा सुव्यवस्थेवर कोण बोलत नाही, फसलेल्या योजनांवर कोण बोलत नाही फक्त जाती-जातीत आणि धर्मामध्ये तेढ निर्माण केले जात आहे. जाती-जातीमध्ये दुही निर्माण केली जात आहे. प्रश्न विचारणाऱ्यांना ताब्यात घेतले जात असल्याची खंत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, बिहार निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केंद्र सरकार जातनिहाय जनगणनेची घोषणा केली. कारण बिहारमध्ये तेजस्वी यादव आणि नितीशकुमार यांच्या सरकारने जातनिहाय जनगणना केली तेव्हा 65 टक्के ओबीसी समाज होता. असे असताना जातनिहाय जनगणनेला विरोध केला तर पारडं उलटं फिरेल म्हणून जातनिहाय जनगणनेचे बिस्किट दिलेय. जसे इव्हीएम मध्ये घोळ झाला तसा जातनिहाय जनगणनेत केला तर सगळं संपले असे आव्हाड म्हणाले.यावेळी प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव,प्रदेश सचिव बशीर मुर्तुझा,जिल्हाध्यक्ष सुरेश बने,जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर,शहराध्यक्ष नीलेश भोसले,नौसीन काझी उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List