बनावट नोटा छापून चलनात आणल्या; भोपाळमध्ये डिलिव्हरी बॉयला अटक
भोपाळ पोलिसांनी घरी बनावट नोटा छापल्याबद्दल आणि चलनात आणल्याबाबत एका डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे. पोलिसांनी एका संशयित दुचाकीस्वाराला अडवले आणि त्याची तपासणी केली. त्यावेळी हे प्रकरण उघडकीस आले. झाकीर खान असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी हाऊसिंग बोर्ड चौकात वाहन तपासणी नाका उभारला होता. या कारवाईदरम्यान 2 मे रोजी संध्याकाळी एका अस्पष्ट नंबर प्लेट असलेल्या दुचाकीचा पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी दुचाकीस्वाराला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला पकडण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली.
प्राथमिक चौकशीदरम्यान, त्या व्यक्तीने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी स्कूटरच्या स्टोरेज डब्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 100 रुपयांच्या अनेक नोटा आढळून आल्या, त्या सर्व बनावट होत्या. नोटांवरील अनुक्रमांक एकसारखे असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली, जिथे त्यांना बनावट नोटा छापण्यासाठी वापरला जाणारा एक एचपी प्रिंटर आणि 100 रुपयांच्या नोटांचा एक बंडल आढळले. समान अनुक्रमांक असलेल्या कागदाच्या 50 शीट्स देखील पोलिसांनी जप्त केल्या. नकली नोटा छापण्यासाठी वापरले जाणारे इतर साहित्य देखील जप्त केले असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List