…तर माझे शब्द मागे घेतो, मुख्यमंत्रीपदाबाबतच्या विधानावरून अजित पवार यांचा यू टर्न!
महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-2025मध्ये बोलताना अजित पवार यांनी एक विधान केले होते. मलाही मुख्यमंत्री व्हायचंय, पण योग जुळून आलेला नाही, असे अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या या विधानांचे अनेक राजकीय अर्थ निघाले आणि त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही उमटल्या. यामुळे अडचणीत येत असल्याचे पाहताच अजित पवार यांनी यू टर्न घेत आपले शब्द मागे घेतले आहेत.
महिलांना संधी मिळाली पाहिजे. राज्यात महिला मुख्यमंत्री व्हावा असे सर्वांना वाटते. पण ते अद्याप शक्य झालेले नाही. कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं आहे. पण तो योग कुठेही जुळून आलेला नाही, अशा भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या होत्या. अजित पवार गटातील इतर नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही तशी अपेक्षा बोलून दाखवली. मात्र आता हे शब्दच अजित पवार यांनी मागे घेतले आहेत.
मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानावरून पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की, मी आपलं गंमतीने म्हटले. मी जर तसे म्हटलेले असेल तर माझे शब्द मी मागे घेतो. तसेच कार्यकर्त्यांची इच्छा तर आहे असे विचारले असता ते म्हणाले की, तुझी जरी इच्छा असली तरी 145 आमदारांचा पाठिंबा मिळाला तरच पूर्ण होईल. जोपर्यंत कुणाला 145 आमदारांचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री होता येत नाही.
आज देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी 145 पेक्षा जास्त आमदारांनी पाठबळ दिले, त्याच्या आधी एकनाथ शिंदेंना दिले आणि त्याच्या आधी उद्धव ठाकरे यांना दिले. हे पाठबळ मिळाले की त्या-त्या वेळी ते मान्यवर मुख्यमंत्री होत असतात, असेही अजित पवार म्हणाले.
मलाही मुख्यमंत्री व्हायचंय, पण योग जुळून आलेला नाही! अजित पवार यांनी व्यक्त केली भावना
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List