Pune News – इन्स्टाग्रामवर बहिणीचा फोटो पाठवल्याने संतापला, जाब विचारण्यास गेलेल्या भावाचाच आरोपीने काटा काढला
इस्टाग्रामवरती केलेल्या मेसेजचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका तरुणाची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील भवानीनगरमध्ये घडली. आकाश मुशा चौगुले असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अवघ्या पाच तासांत आरोपीला अटक केले. राजेश पवार असे अटक आरोपीचे नाव आहे.
बहिणीचा फोटो इन्स्टाग्राम मेसेजवर पाठवल्याच्या कारणातून मयत आकाश आणि त्याची आई आरोपीला जाब विचरण्यास गेले. जाब विचारल्याचा रागातून आरोपी राजेशने आकाशचा गळा आवळत त्याला दगडावर आपटले. आकाश तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी तीन पथके तयार केली. ही पथके बारामती तालुका आणि इंदापूर तालुक्याच्या दिशेने रवाना करण्यात आली.
शोध घेत असताना आरोपी कडबनवाडी (ता.इंदापूर) गावच्या हद्दीत वनविभागाच्या क्षेत्रात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सदर परिसरात आरोपीचा शोध घेण्यास सुरवात केली. पोलिसांची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेत आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय टेळकीकर, पोलीस हवालदार गुलाबराव पाटील, शैलेश स्वामी, दत्तात्रय चांदणे, जगदीश चौधर, विकास निर्मळ, अभिजीत कळसकर, विक्रमसिंह जाधव यांनी कामगिरी पार पाडली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List