धारावीत दुसरी बीकेसी उभारण्याचा अदानीचा डाव हाणून पाडू! धारावी बचाव आंदोलनाच्या सभेत एल्गार
मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या धारावीच्या आजूबाजूला सात रेल्वे स्थानके आहेत. शाळा, कॉलेज, रुग्णालये अशा सर्व नागरी सोयीसुविधा एकाच ठिकाणी मुंबई महापालिका देत आहे. धारावीत अनेक उद्योग असून त्यामुळे एक अब्जाहून जास्त उलाढाल होते. त्यातून सरकारला मोठ्या प्रमाणात करही मिळतो. मात्र आता मुंबईचे काळीज असलेल्या धारावीतून एक लाख झोपड्या, घरे, दुकाने, गाळे यांना अपात्र ठरवून येथे दुसरे बीकेसी उभारण्याचा अदानीचा डाव आहे, मात्र हा डाव हाणून पाडू, असा एल्गार धारावी बचाव आंदोलनाचे नेते आणि माजी आमदार बाबूराव माने यांनी केला.
धारावीमधील शिवराज मैदानावर धारावी बचाव आंदोलन समितीची विशाल जनसभा झाली, त्यावेळी बाबूराव माने बोलत होते. धारावी 540 एकर जमिनीवर पसरलेली आहे आणि या क्षेत्रावर 1 लाख 10 हजार झोपड्या, घरे, दुकाने, गाळे आहेत. या झोपड्या घरे, दुकाने गाळय़ांना 500 चौरस फूट इतकी जागा दिली तरी संपूर्ण धारावीकरांचे पुनर्वसन इथेच होऊ शकते, असे धारावी बचाव आंदोलनातील नामांकित इंजिनीअरने अभ्यास करून छातीठोकपणे सांगितलेले आहे, असे माने यांनी धारावीकरांच्या लक्षात आणून दिले. धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक राजेंद्र कोरडे, काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड यांची भाषणे झाली.
यावेळी विधानसभा प्रमुख सुरेश सावंत, जोसेफ कोळी, शाखाप्रमुख सतीश कटके, आनंद भोसले, किरण काळे, मनीकडंन, भास्कर पिल्ले, महिला आघाडीच्या कविता जाधव, माया जाधव, देवयानी कोळी, मंजू वीर, युवासेनेचे सनी शिंदे, रोहित शिंदे, राष्ट्रवादीचे उल्लेश गजाकोश, सपाचे राहुल गायकवाड, बसपचे श्यामलाल जैस्वार, ‘आप’चे राफेल पॉल, शाम्या कोरडे आदींसह धारावीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बीडीडीतील घरांपेक्षा धारावीतील घरे मोठी
वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत 140 ते 150 चौरस फुटांची घरे असलेल्यांना राज्य सरकार 500 चौरस फुटांपेक्षा जास्त आकाराची घरे देणार आहेत. मग इथे तर 150 पासून ते 300 चौरस फुटांपेक्षा जास्त आकाराच्या झोपड्या, घरे, गाळे आहेत. असे असताना राज्य सरकार, अदानी कंपनी आम्हाला 500 चौरस फुटांची घरे का देत नाही, असा सवालही माने यांनी केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List