विमानतळावर लँडिंग करताना तांत्रिक बिघाड, सुरक्षा भिंतीवर आदळल्याने विमानाला अपघात
विमानतळावर लँडिंग करताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने प्रशिक्षणार्थी विमान धावपट्टीच्या बाहेर गेले आणि सुरक्षा भिंतीवर आदळले. अलीगढ विमानतळावर रविवारी ही घटना घडली. सुदैवाने यात पायलट सुखरुप बचावला आहे. विमान वाहतूक विभागाचे संचालक एसएस अग्रवाल यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पायोनियर अकादमीचे प्रशिक्षण विमान अलीगढच्या धनीपूर हवाई पट्टीवर उतरत होते. यादरम्यान, तांत्रिक बिघाडामुळे विमान अनियंत्रित झाले आणि धावपट्टीवरून घसरत सुरक्षा भिंतीवर आदळले. या अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले आहे. विमानाला अपघात होताच विमानतळावर उपस्थित असलेल्या अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विमानात अडकलेल्या पायलटला सुखरूप बाहेर काढले.
हे सोलो पायलट विमान पायोनियर अकादमीचे होते. या विमानात नवीन वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु विमानाचे नुकसान झाले आहे, असे विमान वाहतूक विभागाचे संचालक एसएस अग्रवाल यांनी सांगितले. अपघाताच्या नेमका कशामुळे झाला याबाबत तपास सुरू आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List