मग इंग्रजी शाळा बंद करुन दाखवा, मनसेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
राज्यात हिंदी सक्तीच्या विषयावरुन वातावरण तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा मुद्दा उचलला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंग्रजीचे कौतूक केले जाते, पण हिंदी सारख्या भारतीय भाषेला विरोध केला जात असल्याचा टोला मनसे आणि शिवसेना उबाठाचे नाव न घेता लगावला होता. त्याला आता मनसेने उत्तर दिले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर इंग्रजी शाळा बंद करण्याचे आव्हान दिले आहे.
संदीप देशपांडे म्हणाले की, भाजप हा सरकारमधील पक्ष आहे. सरकारमधील पक्षाने जबादारीने वागण्याची गरज आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये पहिली माध्यमाची भाषा सक्तीची आहे. दुसरी मराठी भाषा ही सक्तीची आहे. तसेच तिसरी भाषा हिंदी ही अनिवार्य असल्याचे म्हटले नाही. त्यावर त्या, त्या राज्याला भाषा निवडण्याचे स्वातंत्र दिले आहे. तिसरी भाषा निवडण्याचे स्वातंत्र आहे, मग हिंदीची सक्ती का? असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.
संदीप देशपांडे यांनी सांगितले की, भाषेच्या विषयाबाबत आमच्या सोबत चर्चा करा. भाषा समितीसोबत चर्चा करा. ‘सबका साथ, सबका विकास’ म्हणतात, मग सगळ्यांसोबत चर्चा करा. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले इंग्रजीला विरोध केला जात नाही? पण हिंदीला विरोध होत आहे. तुम्ही तर सरकारमध्ये आहात. तुम्ही इंग्रजी शाळा बंद करा. आमचा त्याला विरोध नाही. हिंमत असेल तर इंग्रजी शाळा बंद करुन दाखवा. त्या ठिकाणी मराठी शाळा करून दाखवा, असे आव्हान संदीप देशपांडे यांनी दिले.
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या विषयावर संदीप देशपांडे म्हणाले, दोन भावांचा विषय आहे. त्यावर राज ठाकरे बोलतील. राज साहेब सध्या बाहेर आहेत. ते परत आल्यावर या विषयावर भूमिका मांडतील. या विषयावर आतापर्यंत जी भूमिका होती, ती मी सांगितली आहे. शंकराचार्य आदरणीय व्यक्ती आहेत. गंगेचे पाणी शुद्ध आहे की नाही हे त्यांनी सांगावे. त्यांनी राज ठाकरे यांचे भाषण पुन्हा ऐकावे, असे संदीप देशपाडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
मुंबई शहरातील समस्यांसंदर्भात सर्व पक्षीय बैठक मनसे घेणार आहे. येत्या २६ तारखेला मुंबई पालिकेजवळ असलेल्या पत्रकार भवन येथे ही बैठक होणार आहे. त्या बैठकीला प्रत्येक पक्षातील प्रतिनिधीला बोलवणार आहे. यामध्ये मुंबईच्या समस्यांवर चर्चा होईल, तसेच त्यातून मार्ग निघाला तर चांगले आहे, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List