भूतकाळ पाहू नका…भविष्याचा विचार करण्याचे संजय राऊत यांचा राज ठाकरे यांना संदेश
शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यावरुन राज्यात राजकीय चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्याबाबत शिवसेना उबाठा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सोमवारी पुन्हा एकदा भूमिका मांडली. तसेच भूतकाळात काय झाले ते पाहू नका, भविष्याचा विचार करा. महाराष्ट्राचा विचार करा, असा संदेश त्यांनी राज ठाकरे यांना दिला.
ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत संजय राऊत म्हणाले, दोन प्रमुख नेत्यांनी एकत्र येण्याबाबत भूमिका मांडल्या आहेत. त्यानंतर काही लोकांना वेदना होणार आहे. त्यांच्या पोटात मळमळ होत असले, त्याकडे आम्ही दुर्लक्ष करत आहोत. कारण त्या लोकांना कायमचे शेतात जावे लागले. संघाच्या शाखेत जावे लागले, अशी भीती त्या लोकांना आहे.
मनसेकडून शिवसेनाचा जुना इतिहास सांगितला जात आहे. त्यावर संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी स्थापन करण्यापूर्वी एकमेकांवर प्रचंड टीका करत होतो. परंतु आम्हाला एकत्र यायचे होते, तेव्हा आम्ही भूतकाळ पाहिला नाही. जेव्हा राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी हातमिळवणी करतो तेव्हा भूतकाळ कशासाठी पाहावे. आम्हाला महाराष्ट्राचे भवितव्य घडावायचे आहे, हे दोन नेत्यांमध्ये ठरले आहे. आमचा दृष्टीकोन सकारात्मक आहे.
संजय राऊत यांनी मनसेमधील दुसऱ्या फळीच्या नेत्यांना फटकारले. ते म्हणाले, राज ठाकरे यांनी स्वत: या विषयावर मत व्यक्त केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मत व्यक्त केल्यावर इतरांनी त्यात बोट घालण्याची गरज नाही. राज ठाकरे यांच्या मनात काही विचार पक्के असल्याशिवाय एकत्र काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली नसती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही ही भूमिका मांडली. आमच्या पक्ष प्रमुखांकडूनही संदेश दिला गेला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी फक्त संकेत दिल्यावर राज्यात इतकी आग लागली आहे. जर ते एकत्र आले तर काय होईल? असे राऊत यांनी म्हटले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List