पुणे विद्यापीठ चौकातील ग्रेड-सेपरेटर आणि उड्डाणपूलाला जोडणाऱ्या रॅम्पच्या कामाला स्थायी समितीची मंजुरी, वाहतुक काेंडी सुटण्यासाठी होणार मदत
शहरातील वाहतुकीच्या दृष्टिने महत्वाच्या असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील प्रस्तावित ग्रेड-सेपरेटरच्या कामाला आणि बाणेर – पाषाणकडे जाण्यासाठी विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचा वापर करता यावा, यासाठी उड्डाणपुलास जोडणारा कनेक्टींग आर्म (दोन लेन रॅम्प) उभारण्यास महापालिकेच्या स्थायी समितीने शुक्रवारी मंजुरी दिली. यामुळे या चाैकातील वाहतुक काेंडी सुटण्यासाठी मदत हाेणार आहे. हे काम पुर्ण करण्यासाठी पावसाळ्यासह २४ महिन्यांची मुदत दिली आहे.
शहरातील वाहतूक समस्येचं निराकरण करण्यासाठी पुणे महापालिका, शहर वाहतूक पोलीस आणि पीएमआरडीए विविध कामे करत आहेत. पीएमआरडीए कडून शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावर मेट्रो प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी अडसर ठरणारे विद्यापीठ चौकातील दोन उड्डाणपूल कोरोना काळात पाडण्यात आले होते. त्यांच्या जागी एकाच खांबावर दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. उड्डाणपुलाच्या पहिल्या मजल्यावर दुहेरी वाहतूक आणि त्यावरील भागावर मेट्रो मार्गिका, अशी उड्डाणपुलाची रचना आहे.
हा विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपूल उभारण्याचं काम लवकरच पूर्ण होणार आहे. यामुळे पाषाण आणि बाणेर दिशेने जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबरोबर विद्यापीठ चौकात ग्रेड-सेपरेटर उभारण्याचे नियोजन आहे. दुमजली उड्डाणपुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर ग्रेड-सेपरेटरचं काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. सध्या उड्डाणपुलाचं काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे ग्रेड-सेपरेटरचं काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या प्रकल्प विभागाने निविदा प्रक्रीया राबविली हाेती. या कामासाठी केलेल्या प्रस्तावात बदल करुन ग्रेड सेपरेटरची लांबी कमी केली. यासंदर्भात वित्तीय समितीच्या बैठकीत निर्णय झाला हाेता. वित्तीय समितीने मान्य केलेल्या प्रस्तावानुसार निविदा प्रक्रीया राबविली गेली. साधारणपणे या कामासाठी सुमारे ६७ काेटी रुपये इतका खर्च अपेक्षित पकडण्यात आला हाेता. प्रत्यक्षात सुमारे ५४ काेटी ३१ लाख रुपयांची निविदा काढली गेली. जितेंद्र सिंग या ठेकेदाराची सुमारे निविदेच्या रक्कमेच्या सुमारे ११ टक्के कमी दराने निविदा आली होती. त्यामुळे हे काम त्याला देण्यात येणार आहे. त्यांनी ४८ काेटी २८ लाख रुपयांची निविदा भरली हाेती.
असा असणार ग्रेड-सेपरेटर आणि रॅम्प
हा ग्रेड-सेपरेटर सिमला ऑफिस बाजूने ते औंध दिशेला असेल, अंडरपासची लांबी २१० मीटर, रुंदी ८ मीटर (२ लेन) असणार आहे. तर सेनापती बापट रस्त्यावरून येणारा दोन लेन रॅम्पची लांबी १५२ मीटर दोन लेन आणि रुंदी १२० मीटर असणार आहे. या कामांसाठी दोन वर्षांची मुदत असणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List