अबब फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स अकाउंट चालवण्यासाठी महिन्याला ९४ हजार; पुणे बाजार समितीचा सोशल मीडियावर लाखोंच्या उधळपट्टीचा ठेका
पुणे बाजार समितीने फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स अकाउंट चालवण्याच्या कामासाठी वर्षाला तब्बल ११ लाख ३२ हजार रुपयांचा ठेका दिल्याने नवा झोल समोर आला आहे. महिन्याला तब्बल ९४ हजार ४०० रुपये देऊन सोशल मीडिया हाताळणीसाठी बाह्य संस्थेला काम देण्यापेक्षा, बाजार समितीकडे स्वतःचे कर्मचारी नाहीत का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यामुळे बाजार समितीच्या उधळपट्टीला कोण आवर घालणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
पुणे बाजार समितीवर संचालक मंडळ आल्यापासून शेतमाल वाहनांकडून पार्किंगच्या नावाखाली लूट, वाढलेले डमी आडते, शेतमाल चोऱ्या, नियमबाह्य निर्णयांना ऊत आला आहे. बाजारात अनेक ठेके नियमबाह्य पद्धतीने दिले असून यातून संचालकांबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांचे चांगभलं सुरू असल्याचे दिसून येते. अशातच बाजार समितीकडून शेतकरी हिताच्या कामांवर खर्च करण्याऐवजी प्रचार-प्रसारासाठी तब्बल ९४ हजार ४०० रुपये इतकी मोठी रक्कम खर्च करणे कितपत योग्य, याबाबतही शंका उपस्थित होत आहेत. हा ठेका स्ट्रेट अँगल्स मीडिया प्रा. लि. कात्रज, पुणे यांना देण्यात आला आहे. केवळ आर्थिक फायद्यासाठी असा कारभार सुरु असल्याची चर्चा आहे. यापूर्वीही संचालक मंडळावर विविध कोट्यवधीचे आर्थिक गैरव्यवहार आणि निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचे आरोप झाले आहेत. याबाबत बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
नियमबाह्य पद्धतीने ठेका
बाजार समितीवर संचालक मंडळ येऊन अडीच वर्षे होत आहे. आत्तापर्यंत संचालक मंडळाने अनेक नियमबाह्य कामे केली आहेत. सोशल मिडिया कामाचा ठेका देताना बाजार समितीने कोणतीही नियम पाळले नसल्याचे सांगितले जात आहे. तब्बल अडीच वर्षांनंतर अचानक हा ठेका देण्यामागे काय उद्देश आहे यावर कोणाही बोलण्यास तयार नाही.
बाजार समिती कर्मचाऱ्यांना सोशल मिडियाचे आकलन नाही?
बाजार समिती मध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करणारे आणि याबाबत माहिती असणारे अनेक जण आहेत. तर आजच्या आधुनिक जगात सर्वांकडे मोबाईल आणि त्यावर सोशल मिडीयाचा वापर केला जातो. मात्र बाहेरचा माणूस नेमून लाखो रुपयांची उधळपट्टी कोणासाठी केली जात आहे ?बाजार समिती कर्मचाऱ्यांना सोशल मिडियाचे आकलन नाही? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List