मराठी माणूस आंदोलनासाठी मुंबईत नाही तर काय सुरत, गुवाहाटीत जाणार का? उद्धव ठाकरे यांचा सरकारला खडा सवाल
मराठा समाज आरक्षणासाठी इरेला पेटला आहे. महायुती सरकारकडून मात्र मराठा समाजाची उपेक्षा केली जात आहे. मनोज जरांगे यांना मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठीही सरकारने अडथळा आणला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. लाखो मराठा बांधवांना न्याय्य हक्कांसाठी नाइलाजाने मुंबईत यावे लागले आहे. मुंबई ही मराठी माणसाची राजधानी आहे. मराठी माणूस मुंबईत नाही येणार तर मग सुरत आणि गुवाहाटीला जाणार का, असा खडा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
‘मातोश्री’ निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षणाबाबत महायुती सरकारच्या भूमिकेबाबत उद्धव ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मराठा समाजाकडे सरकारने नेहमीच दुर्लक्ष केले. मराठा समाजाला वापरून फेकून दिले, असा घणाघात त्यांनी केला.
महाविकास आघाडी सरकारमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही अशा आरोपाचा उद्धव ठाकरे यांनी यावेळी समाचार घेतला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, त्यांचे सरकार असते तर मराठा समाजाला न्याय दिला असता. आता त्यांचे सरकार आहे, त्यामुळे त्यांनी आरक्षण द्यायला हवे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. महाविकास आघाडीचे सरकार पाडून महायुतीचे सरकार तुम्ही आणलात, मग आमचे सरकार पाडलात कशासाठी, असा सवालही त्यांनी केला.
टोलवाटोलवी नको, तोडगा काढा
पुनः पुन्हा मुख्यमंत्री होऊनही प्रश्न का सुटत नाही? आतापर्यंत मराठय़ांना फसवण्यात आले. ही सर्व जबाबदारी सरकारची आहे. गणेशोत्सव सुरू आहे. मराठा बांधव मुंबईत दंगल करायला आलेले नाहीत, न्याय्य हक्कांसाठी आले आहेत, पण त्यांना न्याय देण्याऐवजी, तोडगा काढण्याऐवजी फक्त टोलावाटोलवी सुरू आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
आरक्षण देतो म्हणून शड्डू ठोकणारे गावाला पळाले का?
उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही यावेळी अनुल्लेखाने हाणले. सरकारमधील एक आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देऊ म्हणून शड्डू ठोकला होता. आता ते गावी पळाले का, का फक्त दर्शन घेतात? गेले अडीच वर्षे ते मुख्यमंत्री होते, आता अडीच वर्षे ते उपमुख्यमंत्री आहेत, मग ते जरांगेंना न्याय का देऊ शकत नाहीत, असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना उद्देशून केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List