छत्तीसगडमधील मंत्रिमंडळ विस्तार घटनाबाह्य, 14 मंत्री बनवण्याची परवानगी केंद्रानं कधी दिली? काँग्रेसचा सवाल
छत्तीसगडमध्ये तब्बल 20 महिन्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आणि तीन आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. यानंतर छत्तीसगडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याच्या स्थापनेनंतर प्रथमच मुख्यमंत्री धरून 14 मंत्री झाले असून यावरून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेश बघेल यांनी टीका केली आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार घटनाबाह्य असून अशा विस्तारासाठी केंद्रसरकारची परवानगी मिळाली का? असा सवाल बघेल यांनी उपस्थित केला.
भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून बुधवारी आमदार गजेन्द्र यादव, आमदार गुरु खुशवंत साहेब आणि आमदार राजेश अग्रवाल यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे राज्याजी स्थापना झाल्यापासून मंत्र्यांचा आकडा 13 हून जास्त झालेला नाही, परंतु आता हा आकडा 14 झाला आहे. यावरून काँग्रेसने टीका केली. भारतीय जनता पक्षाने मंत्रिमंडळ विस्ताराचा बाजार मांडला आहे. नियमानुसार 15 टक्क्यांहून अधिक आमदार मंत्री बनू शकत नाही, मग भाजपने तीन आमदारांना मंत्रिपदाची शपथ कशी दिली? असा सवाल भूपेश बघेल यांनी केला.
भाजपने घटनात्मक तरतुदींची थट्टा केल्याचा आरोप बघेल यांनी केला. नियम स्पष्ट सांगतो की केवळ 15 टक्के आमदारच मंत्री होऊ शकतात. आमच्या सरकारच्या काळात आम्ही छत्तीसगडचे विस्तीर्ण भौगोलिक स्वरूप लक्षात घेऊन आणखी एका मंत्रिपदाची मागणी पंतप्रधानांकडे केली होती, पण ती नाकारण्यात आली. आता भाजपने मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. याला केंद्र सरकारची परवानगी मिळाली का? राजपत्र अधिसूचना निघाली का? नसेल तर हा विस्तार घटनाबाह्य आहे, असा दावा बघेल यांनी केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List