झारखंडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून तीन नक्षलवाद्यांचा खात्मा, एके-47 आणि इन्सास रायफल जप्त
झारखंडमध्ये शनिवारी सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. या चकमकीत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. घटनास्थळाहून एक एके 47 रायफल आणि दोन इन्सास रायफल हस्तगत करण्यात आल्या आहेत. गुमला येथील घाघरा पोलीस स्टेशन अंतर्गत लवाडाग गावाजवळ ही चकमक झाली. या चकमकीत झारखंड जन मुक्ती परिषद (जेजेएमपी) चे तीन नक्षलवादी ठार झाले. झारखंड जग्वार आणि गुमला पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
जेजेएमपीचे नक्षलवादी लवाडाग चोरलटवा गावाजवळील एका घरात लपून बसल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे झारखंड जग्वार आणि जिल्हा पोलिसांच्या संयुक्त पथकाने परिसराला वेढा घातला. पोलिसांची चाहूल लागताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला.
प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात तीन नक्षलवादी ठार झाले. दोन नक्षलवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांपैकी एकाची ओळख पटली असून दिलीप लोहारा असे त्याचे नाव आहे. इतर दोघांची ओळख पटवली जात आहे. फरार नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी परिसरात अजूनही शोध मोहीम सुरू आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List