घाटीवळे रेल्वे बोगद्यात मंगला एक्सप्रेसची धडक लागून वृद्धाचा मृत्यू
संगमेश्वर तालुक्यातील घाटीवळे रेल्वे बोगद्यात गुरुवारी (दि. 24 जुलै) दुपारी झालेल्या दुर्दैवी अपघातात लांज्यातील एका वृद्धाचा मृत्यू झाला. सीताराम भिवा दरडे (वय ७०, रा. आडवली चौक, लांजा) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ट्रॅक ओलांडताना मंगला एक्सप्रेसची जोरदार धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरडे हे आपल्या वाडीकडे जात असताना वाट चुकून घाटीवळे येथील रेल्वे ट्रॅकच्या दिशेने गेले. दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास ट्रॅकवरून जात असताना, रत्नागिरीकडून येणाऱ्या मंगला एक्सप्रेसने घाटीवळे बोगद्याजवळ त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्यांनी जागीच प्राण सोडले. अपघातानंतर पोलिसांसमोर मृतदेहाची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान होते. मात्र, मृत सीताराम दरडे यांनी परिधान केलेल्या टी-शर्टवर त्यांच्या गावाचे नाव ‘आडवली’ छापलेले होते. त्याच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला आणि अल्पावधीतच मृताचे पूर्ण नाव व पत्ता समजून आला. देवरूख पोलीस ठाण्याचे निरीक्षक उदय झावरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी सहायक उपनिरीक्षक एस. एस. पंदेरे, हेडकॉन्स्टेबल प्रशांत मसुरकर, सचिन कामेरकर, संजय कारंडे आणि महिला कॉन्स्टेबल रेणुका कांबळे हे अधिकारी उपस्थित होते.
या घटनेची देवरूख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, मृतदेहाचे देवळे प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या हृदयद्रावक घटनेमुळे स्थानिक नागरिकांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, अशा ठिकाणी होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अधिक दक्षता घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List