बिहारमध्ये NDA मध्ये जुंपली, अशा सरकारला पाठिंबा दिल्याचे दुःख; चिराग पासवान यांचा नितीश कुमार सरकारवर हल्लाबोल
बिहारमध्ये आगामी निवडणुका लक्षात घेता राजकीय घडामोडी वाढत आहे. आता बिहारमध्ये NDA मध्येच जुंपल्याचे चित्र आहे. केंद्रीय मंत्री असलेल्या चिराग पासवान यांनी बिहार विधानसभा निवडणुका लढवण्याची घोषणा करत भाजप आणि जदयूची डोकेदुखी वाढवली आहे. त्यातच आता त्यांनी बिहार सरकारवर आणि नितीश कुमार सरकारवर उघड टीका केली आहे. त्यामुळे आगामी काळात बिहारमधील हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी नितीश कुमार सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, बिहारमध्ये एकामागून एक गुन्हेगारी घटना घडत आहेत. राज्यात गुन्हेगारी वाढत असून प्रशासन गुन्हेगारांसमोर पूर्णपणे झुकत असल्याचे दिसते. अशा घटना का कमी होत नाहीत? बिहारमध्ये खून, दरोडा, अपहरण, बलात्काराच्या घटना सतत घडत आहेत. प्रशासन या घटना थांबवण्यात अपयशी ठरले आहे. ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांचे दुःख समजून घेतले पाहिजे. अशा सरकारला पाठिंबा देत आहे याचे मला दुःख आहे, जिथे गुन्हेगारी पूर्णपणे बेलगाम झाली आहे. येथे बिहारी सुरक्षित नाहीत, असा हल्ला त्यांनी नितीश सरकारवर केला आहे.
यापूर्वी चिराग पासवान यांनी बिहारच्या राजकारणात प्रशांत किशोर यांच्या प्रामाणिक भूमिकेचे कौतुक केले होते. जो कोणी जात, पंथ किंवा धर्माऐवजी राज्याचा विचार करतो त्याचे तेथे स्वागत आहे, असे चिराग पासवान म्हणाले होते. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलणार का, याबाबतच्या चर्चा सुरू आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List