सप्लाय करणाऱ्या मीरा-भाईंदरमध्ये ड्रग्जमाफियाला गोव्यातून उचलले, गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी
डान्स बार, हुक्का पार्लरसह ठाणे, मुंबई, मीरा-भाईंदर परिसरात ड्रग्जचा सप्लाय करणारा ड्रग्जमाफिया अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. अरबाज उर्फ कासीम खान असे या ड्रग्जमाफियाचे नाव असून मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने नॉर्थ गोवा येथून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईमुळे ड्रग्जचा गोरखधंदा चालवणाऱ्या रॅकेटचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
मीरा-भाईंदर पोलिसांनी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील फाऊंटन हॉटेलसमोर एमडी ड्रग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या सोहेल कच्छी उर्फ रेती व अनिकेत वर्मा या दोघांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यांच्याकडून पोलिसांनी 23 लाखांचे 116 ग्रॅम एमडी जप्त केले होते. मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा समांतर तपास केला असता त्या दोघांना कासीम खान याने एमडी पुरवल्याची माहिती मिळाली. त्या-नुसार पोलीस आयुक्त निकेश कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस निरीक्षक रविराज कुराडे यांच्या पथकाने कासिमचा शोध घेतला असता तो गोव्यात लपून बसल्याचे कळले. त्यानंतर पोलिसांनी नॉर्थ गोवा येथे सापळा रचून अटक केली. त्याच्यासोबत काशीगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेली मुलगीदेखील सापडली आहे.
आंतरराष्ट्रीय रॅकेटचे कंबरडे मोडले
कासीम खान याचा आंतरराष्ट्रीय रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. कासीमला बेड्या ठोकल्यामुळे या रॅकेटचे कंबरडे मोडले आहे. कासीमविरोधात मीरा रोड, काशिगाव व काशिमीरा पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List