दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा…गुरुपौर्णिमेनिमित्त तीर्थस्थळी गर्दी, अक्कलकोट-शिर्डी-नृसिंहवाडीत दर्शनासाठी रीघ

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा…गुरुपौर्णिमेनिमित्त तीर्थस्थळी गर्दी, अक्कलकोट-शिर्डी-नृसिंहवाडीत दर्शनासाठी रीघ

‘अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय..!’ च्या जयघोषात श्रीक्षेत्र अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. तसेच देशभरात अन्न हे पूर्णब्रह्माची साक्ष देणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या धर्मादाय न्यास संस्थेचा 38वा वर्धापन दिनही थाटात संपन्न झाला. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी झालेली होती. अन्नछत्र मंडळात लाखो स्वामीभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण, नामस्मरण, जप व श्री गुरूपूजा संपन्न झाले. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे मुख्य पुरोहित मोहन पुजारी, खासदार श्रीरंग बारणे, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, मिलन कल्याणशेट्टी, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे, माजी आमदार आनंदराव पाटील, संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, महेश गावस्कर, उद्योजक भूषण पिटकर, दादाराजे निपाणीकर, अखिल मंडई मंडळ पुणेचे अध्यक्ष जनार्दन उर्फ अण्णा थोरात, ह.भ.प. गंजीधर महाराज, कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले आदी उपस्थित होते.

गेल्या 11 दिवसांपासून श्री गुरुपौर्णिमा व 38 व्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर येथील विविध रक्तपेढीने अन्नछत्र मंडळात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये शेकडो स्वामी भक्तांनी रक्तदान केले.

न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळाने 38व्या वर्षात पदार्पण केले आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, महेश स्वामी यांच्या पथकाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

साईनामाच्या गजराने शिर्डी दुमदुमली

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी राज्यातून व देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. राज्याच्या विविध भागातून आलेल्या पालखीतील साईभक्तांच्या साईनामाच्या गजराने शिर्डी दुमदुमून गेली.

उत्सवाच्या मुख्य दिवशी गुरुवारी श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या पारायणाची समाप्ती झाली. पारायण समाप्ती मिरवणुकीत संस्थानचे तदर्थ समितीच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे (सोनटक्के) यांनी पोथी, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी वीणा, तर उप मुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे व मेकॅनिकल विभागप्रमुख अतुल वाघ यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला. या वेळी संदीपकुमार भोसले, विष्णू थोरात, दीपक लोखंडे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

सकाळी 6.20 वाजता ‘श्रीं’चे मंगलस्नान झाले. सकाळी 7 वाजता श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त समितीच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे (सोनटक्के) व त्यांचे पती प्रेमानंद सोनटक्के यांनी श्रींची पाद्यपूजा केली. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, वंदना गाडीलकर यांच्या हस्ते ध्वजाचे पूजन झाले. त्यानंतर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे राहणार असून गुरुवारची श्रींची शेजारती व उद्या (दि. 11) पहाटेची श्रींची काकड आरती होणार नाही. अमेरिका येथील दानशूर साईभक्त श्रीमती सुभा पै यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.

चेन्नई येथील साईभक्त श्रीमती ललिता मुरलीधरन व कॅ. मुरलीधरन यांनी साईचरणी 3 लाखांचा 54 ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण हिरेजडीत ब्रोच श्री साईचरणी अर्पण केला, तर एका साईभक्ताने सुमारे 2 किलो वजनाचा चांदीचा आकर्षक हार आणि 59 लाखांचा आकर्षक नक्षीकाम असलेला सोन्याचा मुकुट श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केला.

नृसिंहवाडीत दत्तनामाचा जयघोष

श्री गुरुदेव दत्तच्या गजरात कृष्णा–पंचगंगा संगमतीर्थावर गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तनामाचा जयघोष सुरू असून, दिवसभरात लाखापेक्षा अधिक भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांच्या हजेरीने दत्तमंदिर भक्तिमय वातावरणाने फुलून गेले होते.मुख्य मंदिरातील स्वयंभू पादुका पाण्याखाली असल्याने नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आलेल्या श्रींच्या उत्सवमूर्तीचे भाविकांनी दर्शन घेतले.

गुरुपौर्णिमेनिमित्त आज श्री दत्त मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे साडेचार वाजता काकडआरती व षोडशोपचार पूजा, सकाळी सात ते बारा यावेळेत अनेक भक्तांनी ‘श्रीं’ना पंचामृत अभिषेक पूजा सेवा केली. दुपारी 12.30 वाजता श्रींच्या उत्सवमूर्तीवर महापूजा करण्यात आली. तीन वाजता ब्रह्मवृंदाकडून पवमान पंचसूक्तांचे पठण, रात्री दत्त मंदिरात धूप, दीप, आरती असे धार्मिक विधी करण्यात आले. गुरुपौर्णिमा व गुरुपूजन करण्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, गोवा आदी अनेक राज्यांतून असंख्य भक्तगणांनी हजेरी लावली.

दत्त देव संस्थान व ग्रामपंचायतमार्फत गर्दीवर नियंत्रण ठेवले जात आहे. दत्त मंदिर पाण्यात असल्यामुळे दुर्घटना होऊ नये म्हणून मंदिर परिसरात बॅरिकेड्स लावण्यात आले होते. गुरुपौर्णिमेनिमित्त पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Pune News – पत्नीचे अश्लील व्हिडिओ बनवत व्हायरल करण्याची धमकी; पैशासाठी क्लास वन अधिकाऱ्याचं संतापजनक कृत्य Pune News – पत्नीचे अश्लील व्हिडिओ बनवत व्हायरल करण्याची धमकी; पैशासाठी क्लास वन अधिकाऱ्याचं संतापजनक कृत्य
पुण्यात संतापजनक प्रकार समोर आला आहे. पैशांसाठी क्लास वन अधिकाऱ्यानेच पत्नीचे अश्लील व्हिडिओ बनवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अश्लील...
बिहारमध्ये मतांची चोरी? 51 लाख मतदारांची नावे मतदार यादीतून वगळणार, निवडणूक आयोगाने दिली मोठी अपडेट
Vasai News – वसईतील समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद कंटेनर, पोलिसांकडून तपास सुरू
Amarnath Yatra Bus Accident – जम्मू-श्रीनगर महामार्गावर अमरनाथ यात्रेकरूंच्या बसला अपघात; 4 जण जखमी
संगमेश्वर महामार्ग नव्हे मृत्यूचा मार्ग…! ठेकेदार आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे अपघातांची मालिका सुरुच
सरकारचा दबाव, राजकीय वाद, अविश्वास प्रस्तावाचा इशारा की प्रकृती अस्वास्थ? धनकड यांच्या राजीनाम्यावरून तर्कवितर्क सुरू
105 हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या महाराष्ट्राला ‘भिकारी’ म्हणणे हा असंवेदनशीलतेचा कहर, सुप्रिया सुळे संतापल्या