ना नोकरी, ना सॅलरी तरीही 5.50 कोटींचे कर्ज झटक्यात मंजूर; गुजरातमधील SBI शाखेत मोठा घोटाळा, 18 जणांना बेड्या
देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मोठा कर्ज घोटाळा समोर आला आहे. गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील एसबीआयच्या दोन शाखांमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे. जे लोक कर्जाच्या रकमेची परतफेड करण्यास सक्षम नाहीत त्यांनाही बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्जाचे वाटप करण्यात आले. बँकेच्या ऑडिट रिपोर्ट नंतर हा खुलासा झाला आणि एकच खळबळ उडाली. त्यानंतर बँक मॅनेजरने पोलीस स्थानकात धाव घेतली आणि गुन्हा दाखल केला. त्या आधारे पोलिसांनी बँकेच्या माजी मॅनेजरसह 18 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
दाहोद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दोन वेगवेगळ्या शाखांच्या एजंटने माजी मॅनेजरला हाताची धरत हा घोटाळा केला. बोगस सॅलरी स्लिप आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेचे सर्व नीती व नियम पायदळी तुडवत 5.50 कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप केले. कर्ज वाटप करण्यात आलेल्यांमध्ये रेल्वेच्या काही कर्मचाऱ्यांचाही समवेश आहे. त्याचा पगार कमी होता, मात्र सॅलरी स्लीपमध्ये पगाराचे आकडे फुगवून त्यांना अतिरिक्त कर्जाचे वाटप करण्यात आले. एवढेच नाही तर काही लोकांकडे नोकरीही नव्हती. त्यांना सरकारी गाडीवरील चालक, शिक्षक दाखवून त्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे आणि सॅलरी स्लिप तयार कर्जाचे वाटप करण्यात आले.
ऑडिटमध्ये हा प्रकार समोर येताच बँकेच्या मॅनेजरने पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी बँकेच्या माजी मॅनेजरसह 30 जणांनी विरोधात गुन्हा दाखल केला आणि दोन्ही शाखेच्या माजी मॅनेजरसह दोन एजंट आणि कर्जधारकांसह एकूण 18 जणांना बेड्या ठोकल्या.
कोट्यावधी रुपयांचा हा घोटाळा SBI चे बँक मॅनेजर गुरमीत सिंग बेदी यांनी संजय डामोर आणि फईम शेख यांच्यासोबत मिळून 2021 ते 2024 या काळात केला. त्यांनी पदाचा गैरवापर करत आणि नियमांचे उल्लंघन करत रेल्वेच्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना कमी पगार असतानाही 4.75 कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप केले. तर दुसरे बँक मॅनेजर मनीष गवळे यांनी दोन एजंटसोबत मिळून 10 जणांची बनावट कागदपत्रे, सॅलरी स्लिप बनवून त्यांना गुजरात परिवहनमधील चालक, तर काहींना सरकारी शिक्षक दाखवत 82.72 लाखांचे कर्ज वाटप केले.
पोलिसांनी बेड्या ठोकलेले संजय डामोर आणि फईम शेख हे एजंट बनून कर्ज घेण्यासाठी आलेल्या लोकांना बँकेबाहेरच हेरायचे. त्यांच्या सॅलरी स्लिपचा आकडा फुगवून दाखवत ते त्यांना मोठ्या कर्जाचे आमिष दाखवायचे. कर्ज मंजूर झाल्यानंतर आपले कमिशन घ्यायचे. यातील एक हिस्सा बँक मॅनेजरला दिला जायचा. दोन्ही एजंटने बँक मॅनेजरच्या साथीने हा घोटाळा केला. कर्ज घेणारे काही कर्ज धारक नियमित कर्जाचे हप्ते भरायचे. पण ज्यांनी अवैधरित्या कर्ज घेतलं ते काही काळानंतर कर्जाचे हप्ते भरणे बंद करायचे आणि मग हे अकाउंट एनपीए व्हायचं. त्यानंतर 2024 मध्ये ऑडिट करण्यात आले आणि हा घोटाळा उघड झाला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List