ठाण्यातील जुना कोपरी पूल आठ दिवस बंद, 26 जुलै ते 3 ऑगस्ट मिशन गर्डर लाँचिंग; वाहतूककोंडीचा कोपरीकरांना होणार हेडॅक
ठाणे पूर्वेतील सेंटिस प्रकल्पाच्या मार्गिकेसाठी ठाणे रेल्वे स्थानकातील पूर्व-पश्चिमेस उभारलेल्या खांबांवर 26 जुलैपासून गर्डर बसवण्यात येणार आहेत. ही मिशन गर्डर मोहीम 3 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असल्याने जुना कोपरी पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात अधिसूचना काढली आहे. त्यामुळे कोपरीकरांना 8 दिवस वाहतूककोंडीचे ठरणार असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन ठाणे वाहतूक विभागाने केले आहे.
ठाणे पूर्व भागातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने सॅटिस पूर्व प्रकल्प राबवण्यात येत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असून वाहनांची वर्दळदेखील मोठ्या प्रमाणात असते. ठाणे महापालिका आणि रेल्वे अशा दोन्ही यंत्रणा मिळून सेंटिस पूर्व प्रकल्पाचे काम सुरू असून यासाठी तब्बल 260 कोटींचा खर्च केला जाणारा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ठाण्याचा सॅटिस पूर्व प्रकल्प रखडलेला आहे. आता या प्रकल्पातील उड्डाणपुलासाठी रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला खांबांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र या खांबांवर गर्डर टाकण्याचे काम प्रलंबित होते. काही तांत्रिक कारणांमुळे या कामाला मुहूर्त मिळाला नव्हता. मात्र आता हे काम हाती घेण्यात आले असल्याने जुना कोपरी उड्डाणपूल बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांच्या वतीने घेण्यात आला आहे.
असे आहेत वाहतुकीत बदल…
ठाणे पश्चिमेकडून पूर्वेकडे येणाऱ्या सर्व वाहनांना भास्कर कट या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येणार आहे. कोपरी सर्कल, फॉरेस्ट नाका, आनंदनगर सिग्नल, मुंबई-नाशिक महामार्ग या पर्यायी मार्गाने इच्छितस्थळी जाता येणार आहे.
तीन हात नाका आणि टेलिफोन नाका येथून भास्कर कट मार्गे कोपरी सर्कल मार्गे ठाणे पूर्व भागात येणाऱ्या सर्व वाहनांना भास्कर कट या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही सर्व वाहने गुरुद्वारा, आनंदनगर सिग्नल, फॉरेस्ट नाका कोपरी सर्कल मार्गे इच्छितस्थळी जाता येणार आहे.
मुंबईवरून हरिओमनगर मार्गे ठाणे पूर्वेकडे येणाऱ्या सर्व वाहनांना हरिओम कट या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही सर्व वाहने आनंदनगर येथील पुढे सरळ तीन हात नाका येथून युटर्न घेऊन आनंदनगर सिग्नल, फॉरेस्ट नाका, कोपरी सर्कल मार्गे इच्छितस्थळी जाता येणार आहे.
प्रकल्पाची माहिती
प्रकल्पाची किंमत 260.85 कोटी
मार्गाची लांबी 1,947 किमी
बस स्थानक 8 हजार चौरस मीटर
बस टर्मिनल 7 हजार चौरस मीटर
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List