शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची आज एकमताने निवड करण्यात आली. आठ वर्षे ही जबाबदारी सांभाळणारे जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर शरद पवार यांनी नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शिंदे यांच्या नावाची घोषणा केली.
राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यात मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शशिकांत शिंदे शरद पवार यांच्यासोबत आहेत. पक्षातून अजित पवार गट वेगळा झाल्यानंतरही त्यांनी शरद पवार यांची साथ सोडली नाही. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नेते असलेले शशिकांत शिंदे हे साताऱयाच्या जावळी तालुक्यातील हुमगाव येथील आहेत. माथाडी कामगारांचे नेते असलेले शिंदे यांना संघटनात्मक बांधणीचा चांगला अनुभव आहे.
आमदार म्हणून शशिकांत शिंदे यांनी जावळी आणि कोरेगाव या दोन मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघातून त्यांनी उदयनराजे भोसले यांना जोरदार टक्कर दिली होती.
संघर्षाचा काळ आहे म्हणून संघर्ष करणाऱया व्यक्तीला संधी दिली
सध्या संघर्षाचा काळ आहे. त्यामुळेच संघर्ष करणारे शशिकांत शिंदे यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. शशिकांत हा कामगाराचा मुलगा, लिपिक ते माथाडी कामगारातून तयार झालेला कार्यकर्ता आहे. त्यांनी संघर्षाला सामोरे जाण्यापासून कधीही माघार घेतली नाही. सामान्य माणसांच्या विचारांशी निष्ठा ठेवली, असे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार या वेळी म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List