इंग्लंडला रोखण्यासाठी हिंदुस्थानचे फिरकी अस्त्र; जाडेजा, सुंदर आणि कुलदीपपैकी दोघांना संधी
लीड्सवर पराभवाचा धक्का बसल्यानंतर एजबॅस्टनला हिंदुस्थानी संघ बुमरास्त्रासह पूर्ण ताकदीनिशी उतरावा, अशी अपेक्षा होती. पण बुमराला विश्रांती देत इंग्लंडला रोखण्यासाठी हिंदुस्थानने दोन फिरकीवीरांना खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदुस्थानचे फिरकी बाण इंग्लिश संघाच्या बॅझबॉल शैलीला घायाळ करण्यात कितपत यशस्वी ठरतात, याकडे अवघ्या हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
लीड्सवर हिंदुस्थान सुस्थितीत असतानाही हरला. हिंदुस्थानच्या चार फलंदाजांनी शतके झळकवत मोठी धावसंख्या उभारून दिली, पण सुस्थितीत असताना मधल्याफळीची दोन्ही डावात झालेली घसरण हिंदुस्थानच्या पराभवाचे मुख्य कारण ठरली. तसेच गचाळ क्षेत्ररक्षणानेही इंग्लंडला धावा करण्याचे बळ दिले. एवढेच नव्हे तर जसप्रीत बुमरा सोडला तर हिंदुस्थानचा एकही वेगवान गोलंदाज प्रभावी दिसला नाही. त्यामुळे बार्मिंगहॅमला बुमराशिवाय खेळण्याचा हिंदुस्थानी संघव्यवस्थापना विचार कुणाच्याही मनाला भावत नव्हता. तरीही शुभमन गिल आणि गौतम गंभीर हे धाडस करणार आहेत.
बुमराच्या अनुपस्थितीत इंग्लंडच्या बॅझबॉलला रोखण्यासाठी आणि त्यांना फिरकीच्या तालावर नाचवण्यासाठी दोन फिरकीवीर खेळवले जाणार असल्याचे संकते शुभमन गिलने आपल्या पत्रकार परिषदेत दिले आहेत. मात्र यातही कुलदीप की सुंदर असा प्रश्न कायम असला तरी प्राधान्य कुलदीपच्या फिरकीला दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे.
बुमराच्या जागी फिरकीवीर
हिंदुस्थानी संघात नेमके किती बदल होणार आहेत, याबाबत गिल अॅण्ड पंपनीने सस्पेन्स कायम ठेवला आहे. फलंदाजीत सारेच ठीक असले तरी साई सुदर्शन आणि करुण नायरपैकी एकच संघात असेल. तसेच बुमराच्या जागी वेगवान गोलंदाज न खेळविता फिरकीला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे सिराजच्या जोडीला प्रसिध कृष्णा पक्का आहे, पण शार्दुल ठाकूरच्या जागी नितीशला खेळविणार की अर्शदीप किंवा आकाशदीपला संधी देणार, याबाबत काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र तीन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाज खेळविणार असल्याचे गिलने स्पष्ट केले आहे.
संभाव्य अंतिम संघः हिंदुस्थानः गिल (कर्णधार), जैसवाल, केएल राहुल, साई सुदर्शन/ नायर, पंत, जाडेजा/ वॉशिंग्टन सुंदर, नितीशकुमार रेड्डी, सिराज, आकाश दीप/ अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, प्रसिध कृष्णा. इंग्लंडः झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, स्टोक्स (कर्णधार), स्मिथ (यष्टीरक्षक), वोक्स, कार्स, जोश टंग, बशीर.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List