शनिभक्तांची फसवणूक करणाऱ्या पाच बनावट अॅपवर गुन्हा, देवस्थानकडून फिर्याद देण्यास विलंब; पोलिसांकडूनच फिर्याद
शनिशिंगणापूर देवस्थानच्या बहुचर्चित बनावट अॅपद्वारे ऑनलाइन व्हीआयपी दर्शन पूजा, अभिषेक व तेल चढावा यामध्ये भाविकांची फसवणूकप्रकरणी शनैश्वर देवस्थानने फिर्याद देण्यास टाळाटाळ केल्याचे पोलिसांनी फिर्यादीत म्हटले असून, अखेर दीड महिन्यानंतर सायबर पोलिसांनी स्वतः फिर्याद देऊन पाच बनावट अॅप अज्ञातधारक मालक व अज्ञात साथीदारांविरोधात शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सायबर पोलीस अहिल्यानगर सुदाम काकासाहेब काकडे यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पूजा परिसेवा, घर मंदिर, हरी ओम, ऑनलाइन प्रसाद, ई-पूजा या अॅप अज्ञातधारक मालक व साथीदारांनी शनैश्वर देवस्थान व धर्मादाय आयुक्त यांची ऑनलाइन व्हीआयपी दर्शन पूजा अभिषेक व तेल चढावा बुकिंगकरिता कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नाही. शनैश्वर देवस्थानला देणगी न देता सदर यूआरएल संकेतस्थळ अज्ञातधारक मालक यांनी त्यांच्या साथीदारासह शनिशिंगणापूर येथील शनिमहाराजांच्या शिळेचा फोटो, शनी मंदिराचा व महाद्वाराचा फोटो वापरून तसेच संकेतस्थळधारक मालक यांचे कोणतेही अधिकृत पुजारी शिंगणापुरात उपलब्ध नसताना त्यांनी त्यांच्या पुजाऱ्यांमार्फत शनिदेवाची पूजा, अभिषेक व तेल चढावा केला जाईल, असा खोटा मजकूर फसवणुकीच्या उद्देशाने संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन प्रसारित केला आहे.
अज्ञात आरोपींनी ऑनलाइन पद्धतीने भाविकांकडून अनियमित दराने स्वतःच्या फायद्यासाठी रकमा स्वीकारल्या. शनैश्वर देवस्थान व भाविकांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत शनैश्वर देवस्थानचे सुरक्षा अधिकारी गोरख भीमाशंकर दरंदले व देवस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ केरू दरंदले यांना कळूनही देवस्थानने अज्ञात साथीदार व आरोपी यांच्याविरोधात फिर्याद देण्यास टाळाटाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. देवस्थानने जेणेकरून शनिशिंगणापूर पोलीस ठाणे अगर कोणत्याही पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद न दिल्याने सदर प्रकरणाचे संवेदनशील व भाविकांच्या भावनांशी संबंधित असल्याने भाविकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी वरिष्ठ अधिकारी यांनी फिर्यादी यांना शनैश्वर देवस्थान संबंधात वरील गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
अधिवेशनात प्रश्न उपस्थित होताच कारवाई
शनिशिंगणापूर देवस्थानचा भ्रष्टाचार, कथित अॅप ऑनलाइन घोटाळ्याबाबत शुक्रवार (दि. 11) विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित झाला होता. त्यानंतरच मुख्यमंत्री फडणवीस यांनी कारवाईचे आदेश दिले. अहिल्यानगरच्या सायबर पोलिसांनी लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे दीड महिन्यानंतर बनावट अॅपविरोधात गुन्हा दाखल करण्याची तत्परता दाखवली. दरम्यान, सायबर पोलिसांना अजूनही आरोपी निष्पन्न झाले नसून त्यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List