महाभयंकर विमान अपघातातून वाचला, पण रात्रीची झोप उडाली, बोलणेही बंद…
अहमदाबाद येथे 12 जून रोजी एक महाभयंकर विमान अपघात घडला. एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही सेकंदांत एका होस्टेलवर कोसळले. या दुर्घटनेत सर्व 241 प्रवाशी आणि 19 अन्य लोकांचा मृत्यू झाला. अपघातात विश्वास कुमार हा प्रवाशीच आश्चर्यकारकरीत्या वाचला. विश्वास कुमार अपघातातील एकमेव जिवंत व्यक्ती आहे. अपघाताच्या धक्क्यातून तो अद्याप सावरलेला नाही. त्याची रात्रीची झोप उडाली आहे, बोलणेही बंद झाले आहे.
विश्वासच्या चुलत भावाने सांगितले की, तो अजूनही या अपघातातून सावरलेला नाही. विमान अपघाताची ती घटना त्याला अस्वस्थ करत आहे. त्याला या अपघातातून वाचणे आणि भावाच्या मृत्यूने मोठा धक्का बसला आहे. तो ब्रिटिश नागरिक आहे. इंग्लंडमधून त्याला नातेवाईक दिवसभरात मोबाईलवर संपर्क साधतात. त्याची काळजी करतात, पण विश्वास त्यांच्याशी फोनवर फारसा बोलत नाही. भावाच्या मृत्यूने त्याला मोठा धक्का बसला आहे.
विश्वास कुमार याच्यावर अहमदाबाद येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. 17 जून रोजी अहमदाबाद येथील रुग्णालयातून विश्वास पुमारला डिस्चार्ज मिळाला. त्याच दिवशी डीएनए चाचणीनंतर त्याच्या भावाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांना देण्यात आला होता.
मानसोपचार सुरू
विश्वास कुमार झोपेतच अचानक उठून बसतो. मग त्याचा डोळ्याला डोळा लागत नाही. त्या घटनेची आठवण त्याला अस्वस्थ करते. तो एकटाच अंथरुणावर बसून असतो. त्यामुळे त्याला मानसोपचारतज्ञाकडे नेण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अजूनही विमान प्रवासाचे त्याचे धाडस होत नाही. त्यामुळे सध्या तरी लंडनला परत जाण्याचा त्याचा विचार नाही. विश्वास, त्याचा भाऊ अजय हे दोघेही दादरा व नगर हवेली आणि दीव-दमण येथील नातेवाईकांना भेटायला आले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List