प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्यामागे भाजपच्या गुंडांचा हात, हल्लेखोरांवर कारवाई करण्याची हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे रविवारी झालेल्या भ्याड हल्ल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. या हल्ल्यामागे भाजपच्या गुंडांचा हात असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणावर आपल्या ‘एक्स’ एक पोस्ट करत संताप व्यक्त केला. “छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे आणि बहुजन समाजासाठी झटणाऱ्या शिवश्री प्रवीणदादा गायकवाडांवर भाजपच्या गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध,” असे त्यांनी म्हटले. पुढे त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्देशून म्हटले आहे की, “‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ असे तुम्ही म्हणाला होता, आता महाराष्ट्राचा बिहार करूनच थांबणार आहात का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, या हल्लेखोरांवर जनसुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करून आदर्श घालून देण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, प्रवीण गायकवाड हे एका कार्यक्रमासाठी अक्कलकोट दौऱ्यावर होते. यावेळी शिवधर्म फाऊंडेशनच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न केला. यासह त्यांच्या गाडीवर आणि रस्त्यावर त्यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्ला नियोजित होता, असा संशय व्यक्त होत असून, यामागे राजकीय हेतू असल्याचा दावा केला जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List