अधिवेशनांमागून अधिवेशने गेली; मिंध्यांचे फक्त आश्वासनांचे गाजर, टीएमटी कर्मचाऱ्यांच्या थकबाकीचे चाक लालफितीत अडकले
आधीच गाळात चाक रुतलेल्या टीएमटीची अवस्था बिकट झाली असताना परिवहनचे कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून टीएमटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या थकबाकीचे चाक लालफितीत अडकले आहे. जवळपास 2 हजार 500 कर्मचाऱ्यांचे 365 कोटी प्रशासनाने थकवले असल्याने कर्मचाऱ्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान अधिवेशनामागून अधिवेशने गेली तरी या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही. मिंध्यांकडून फक्त आश्वासनांचे गाजर मिळाल्याने या कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा पुन्हा सरकार दरबारी मांडली आहे.
शिवसेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांच्या संकल्पनेतून साकालेल्या परिवहन सेवेची सुरुवात 1989 मध्ये झाली. त्यांच्याच मार्गदर्शनाने टीएमटी एम्प्लॉईज युनियनदेखील स्थापन झाली. त्या काळात उत्तम सेवा देण्यात येत होती. मात्र दिघे यांच्या पश्चात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर टीएमटी परिवहन सेवेचा बट्याबोळ सुरू झाला.
आजतागायत ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेने उभारी घेतलेली नाही. गेली 40 वर्षे सत्तेत असलेल्या मिंधे गटाने टीएमटी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान आगामी पालिका निवडणुकीच्या आधी तरी कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळणार की आमच्या कोपराला गूळच लावणार असा संतप्त सवाल कामगारांनी केला आहे.
सध्याच्या घडीला टीएमटीमध्ये एकूण 1 हजार 654 कामगार कायम असून 450 कंत्राटी कामगार आहेत. तर 1 हजार 200 हून अधिक कामगार हे सेवानिवृत्त झाले आहेत.
कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी पालिकेकडून दरमहा 10 कोटी अनुदान मिळते. मात्र मासिक वेतनाचा खर्चच जवळपास 12 कोटी रुपये असल्याची व्यथा एका अधिकाऱ्यांनी मांडली.
अशा आहेत थकबाक्या
- महागाई भत्ता
- सार्वजनिक सुट्ट्यांचे वेतन
- वैद्यकीय भत्ता
- रजा प्रवास भत्ता
- शैक्षणिक भत्ता
- पूरक प्रोत्साहन भत्ता
- सातव्या वेतन आयोगातील फरक
- सेवानिवृत्तीचा वेतनातील रजा फरक
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List