अमरनाथ यात्रेदरम्यान मोठा अपघात; तीन बस एकमेकांना धडकल्या, 10 जखमी; सर्व यात्रेकरू मध्य प्रदेशचे
पहलगाम अमरनाथ यात्रेदरम्यान भाविकांच्या तीन बस एकमेकांना धडकल्या. या अपघातात 10 हून अधिक लोक जखमी झाले. बालटालच्या दिशेने जाणाऱ्या तीन बस ताचलू क्रॉसिंगजवळ एकमेकांना धडकल्या. धडक बसल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. सर्व जखमींवर प्रथमोपचार करून पुढील उपचारांसाठी अनंतनाग येथे पाठवण्यात आले आहे.
अपघाताबद्दल कळताच तत्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व जखमी यात्रेकरूंच्या जखमा किरकोळ असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जखमींना पुढील उपचारासाठी जीएमसी अनंतनाग येथे पाठवण्यात आल्याचे डॉक्टर म्हणाले.
अमरनाथ यात्रेच्या दहाव्या दिवशी एकूण 19 हजार 20 भाविकांनी पवित्र गुफेतील बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतले. आतापर्यंत 1 लाख 83 हजारांहून अधिक भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले आहे. अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरू झाली होती. 9 ऑगस्टपर्यंत ही यात्रा चालणार आहे. दरम्यान आज सकाळी 7 हजार 49 भाविकांची बारावी तुकडी जम्मूहून भगवती नगर बेस कॅम्पसाठी रवाना झाली.
दुसरी मोठी घटना
अमरनाथ यात्रा सुरू झाल्यापासून अपघाताची ही दुसरी मोठी घटना आहे. याआधी 5 जुलै रोजी काही बस एकमेकांवर आदळल्या होत्या. यात 36 प्रवासी जखमी झाले होते. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेण्यात येत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List