‘ओटीपी’ पाठवून आठ लाखांचा गंडा
शहरातील वारणाली भागात राहणाऱया वृद्ध व्यापाऱयास मोबाईलवर ‘ओटीपी’ पाठवून बँकेतील त्यांची दोन्ही खाती ‘हॅक’ करून आठ लाख 17 हजार 502 रूपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार घडला. याबाबत अरुण वासुदेव कुलकर्णी (वय 72, विद्यानगर, वारणाली रस्ता, विश्रामबाग) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
व्यापारी अरुण कुलकर्णी यांचे सांगलीतील इंडसइंड बँकेत सेव्हिंग आणि करंट खाती आहेत. 6 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच ते 7 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा यादरम्यान अज्ञात भामटय़ाने त्यांच्या मोबाईलवर ‘ओटीपी’ क्रमांक पाठविला होता. त्यानंतर भामटय़ाने कुलकर्णी यांचे सेव्हिंग व करंट खाती ‘हॅक’ केली. या दोन्ही खात्यांवरील आठ लाख 17 हजार 502 रुपये भामटय़ाने परस्पर काढून घेतले.
कुलकर्णी यांना खात्यातील रक्कम परस्पर लंपास केल्याचे लक्षात येताच त्यांनी बँकेत चौकशी केली; परंतु बँकेतून त्यांना कोणाच्या खात्यात रक्कम हस्तांतर झाली, याची माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात माहिती कळविली. अखेर संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. बीएनएस कलम 318 (4) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम-2000नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List