आरक्षित सरकारी जमीन राहू-केतूंनी हडपली! हिंमत असेल तर आव्हान स्वीकारा; अनिल गोटेंचा मुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळेंना इशारा
राहू केतूंनी शासकीय आरक्षित जमीन हडप केली! सोमवारी 26 मे रोजी सकाळी 10 वाजता “पुराव्यासह भव्य पत्रकार परिषद” घेणार असल्याचे सांगत शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे यांनी थेट मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आव्हान दिले आहे. चंद्रशेखर बावनकुळे आणि तुम्ही शासनाची अधिग्रहित केलेली जमीन कशी घशात घालून घेतली. त्याचे प्रत्यक्ष पुरावे सोमवारच्या पत्रकार परिषदेत जाहीर करणार असल्याचा इशारा अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
धुळ्यातील प्रकरणात फडणवीस खोतकर यांना वाचवत आहे की स्वतःलाच वाचवत आहेत? – संजय राऊत
धुळे येथील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील सत्ताधारी आमदारांच्या वसुलीचा भंडाफोड शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केला. राज्य सरकारच्या अंदाज समितीतील दहा आमदारांना देण्यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी पाच कोटींचा मलिदा आणला होता. त्याची कुणकुण लागताच शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे यांच्यासह शिवसैनिकांनी धडक दिली आणि ज्या खोलीत वसुली सुरू होती त्या 102 क्रमांकाच्या खोलीला शिवसैनिकांनी टाळे ठोकले. त्यानंतर तिथेच ठिय्या दिला.
दरम्यान, पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री विश्रामगृहातील रूम नंबर 102 चे कुलूप तोडले असता 1 कोटी 84 लाखांचे घबाड सापडले. काल दिवसभरात किमान साडेपाच कोटी जमा झाले होते. मिंधे गटाचे आमदार अर्जुन खोतकर अध्यक्ष असलेल्या विधिमंडळ अंदाज समितीचे धुळ्यातील वसुलीचे ‘जालना’कांड शिवसैनिकांनी उघडकीस आणताच राज्यात खळबळ उडाली. खोतकर यांचा पीए किशोर पाटील याला निलंबित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. यावरून अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
या आधीच्या SIT बाबत काय घडले हे एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या, असे म्हणत अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला. मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईत आणि गोचीड, जयकुमार रावल सध्या पणन व राज्यशिष्टाचार मंत्रिपद आहे. यांनी बाबासाहेब रावल सहकारी बँकेतील ठेवीदारांच्या रकमा आपल्या नातेवाईकांना वाटून, बँक रिकामी केली. यासाठी त्यांची SIT मार्फत चौकशी केली. SIT चा अहवाल आला. अहवालात जयकुमार रावल यांना आरोपी क्रमांक तीन केले. तत्कालीन पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील, पोलीस उपअधीक्षक यांनी रावल यांच्या अटकेची तयारी केली असल्याचे नाटक केले व इकडे रावलांना फोन करून, भागो! हम आ रहे है।” अशी सूचना पोहोचवली. आपल्या मालकाप्रती इमानदारी व खाल्ल्या अन्नाला मी जागलो, हे सिद्ध करून दिले. साहेबराव पाटलांच्या पत्नीचे बंधूच रावलांचे स्वीय सहाय्यक होते. आता देवेंद्र फडणवीसांवर विश्वास का नाही? याची कारणे… रावलच्या बरोबरीचे सह आरोपी कल्याण मदनलाल अग्रवाल, पारसमल खेतमाल जैन, भावसार ईधरलाल बाबुलाल, चंपालाल अचलचंद, डॉ. युकांत बाहेती, सौ. प्रतिभा भुपेंद्र देसाई यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन दिले. सदर निवेदनात पोलीसांवर दोंडाईचा नगरपालिकेच्या नगराध्यक्षांचा दबाब असल्याचे नमुद करून SIT ऐवजी CID किंवा जिल्हा बाहेरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी अशी विनंती केली. त्याबरोबर तपास पूर्ण झाला असताना सदर प्रकरण मुख्यमंत्र्यांनी कुठलाही शासन निर्णय न होता आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून सदर चौकशी 24 तासांत तातडीने SIT कडून काढून CID कडे सोपविली. तत्पूर्वी आत्ताचे मुंबईचे पोलीस आयुक्त व तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक (का. व. सु.) देवेन भारती यांनी पत्र लिहून आम्ही ही चौकशी करणार नाही, असे नमुद करून स्पष्ट नकार दिला होता, असे अनिल गोटे यांनी सांगितले.
अब्दुल करीम तेलगी याच्या चौकशीसाठी तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी SIT नेमली. सदर SIT ला क्रांतिवीर अण्णा हजारे यांनी विश्वविख्यात शांतिदूत दाऊद इब्राहिम कासकरचे वकील माजिद मेमन यांना लावून SIT चा तपास CBI कडे सोपविला. या सर्व कारस्थानामागे तत्कालीन भाजप नेते होते. याचा मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझा सवाल आहे की, SIT नेमलेल्या वरच्या दोन प्रकरणांची वाट लावली. तशीच याप्रकरणाची वाट लावायची आहे का? मी कधीही हवेत आरोप करत नाही, वस्तुस्थितीजन्य पुरावा असल्याशिवाय बोलत नाही. मी काही भाजपचा वाचाळ प्रवक्ता नाही. आता मुख्यमंत्र्यांना माझं जाहीर आव्हान आहे की, सोमवारी (26 मे 2025) सकाळी दहा वाजता धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन चंद्रशेखर बावनकुळे आणि तुम्ही मिळून शासनाची अधिग्रहित केलेली जमीन कशी घशात घालून घेतली. याचे प्रत्यक्ष पुरावे मांडणार आहे. हिम्मत असेल तर माझे आव्हान स्वीकारा, असा थेट इशारा अनिल गोटे यांनी दिला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List