ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
ज्येष्ठ मराठी अभिनेत्री भारती गोसावी यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीत त्यांनी आपल्या अभिनयाने विशेष छाप पाडली होती. त्यांच्या निधनाने मराठी कला विश्वात शोककळा पसरली आहे.
भारती गोसावी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मराठी चित्रपट, नाटके आणि मालिकांमधून काम केले. त्यांच्या सशक्त अभिनयामुळे आणि नैसर्गिक संवादशैलीमुळे त्या प्रेक्षकांच्या मनात कायमच्या घर करून गेल्या. त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या सहज आणि प्रभावी अभिनयाने त्यांनी प्रत्येक पात्राला जिवंत केले.
गोसावी यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
भारती गोसावी यांनी अत्रे थिएटर्स, कलावैभव, चंद्रलेखा, नाट्यमंदार या संस्थांच्या नाटकात काम केले. काशिनाथ घाणेकर, अविनाश खर्शीकर यांच्यासोबत त्यांनी ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकात गीताची भूमिका साकरली होती.मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी भारती गोसावी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. सामाजिक माध्यमांवरही अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
भारती गोसावी यांच्या पश्चात मुलगी, जावई आणि नात असा परिवार आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना त्यांचे सहकारी आणि प्रेक्षक करत आहेत. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List