मिंधे गटाचे आमदार व स्वीय सहाय्यकाला तात्काळ अटक करा – अंबादास दानवे
सरकारच्या भ्रष्टाचाराची वेगवेगळी प्रकरणे बाहेर येत असून, धुळ्यात काल घडलेला प्रकार हा संतापजनक आहे. मिंधे गटाचे आमदार अर्जून खोतकर व त्यांचा स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकारांशी बोलतांना केली.
अंदाज समितीच्या निमित्ताने धुळ्यात दोन दिवस अगोदरच पोहोचलेल्या अर्जून खोतकरांच्या स्वीय सहाय्यक किशोर पाटीलने मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या विभागातून माया जमवली आणि ती नियोजनबद्ध पद्धतीने आपल्या शासकीय विश्रामगृहातील रुममध्ये लपवली. याचा भांडाफोड झाला. मिळालेल्या रक्कमेपेक्षा अधिकची रक्कम गोळा झाल्याचे व त्यातील काही बॅगा लंपास झाल्याचे दानवे यांनी सांगीतले आणि हा प्रकार संतापजनक असल्याचे ते म्हणाले आहेत. सरकारच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीचा हा नमुना असून, या प्रकरणात अर्जून खोतकर आणि त्यांचा पीए किशोर पाटील या दोघांनाही अटक झाली पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचे अंबादास दावने यांनी सांगितले.
ईडी प्रकरणात केंद्र सरकारची भूमिका ही द्वेश भावनेची असून न्यायालयाने यावर ताशेरे ओढले आहेत. केवळ राजकीय फायद्यासाठी ईडीचा वापर होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. बीडमधील पोलिसांच्या झालेल्या बदल्या या तेथील पोलिसांच्या अंतर्गत असलेल्या प्रक्रियेचा भाग असून, हे शुध्दीकरण अगोदरच व्हायला पाहिजे होतं, असेही ते म्हणाले. एखाद्याच्या खोलीत तेही शासकीय विश्रामगृहात मिळालेली रक्कम त्याची जबाबदारी त्या त्या व्यक्तीवर राहते. ज्यांनी ही खोली बुक केली, त्यातच तो दोषी असतो, त्यामुळे धुळ्याच्या प्रकरणात संबंधितावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.
सरकारने घोषित केलेल्या वेगवेगळ्या पॅकेज संदर्भात व मोठ्या रक्कमेसंदर्भात भाष्य करताना अंबादास दानवे म्हणाले की, सरकारच्या तिजोरीत खणखणाट असून, लोकांना खूष करण्यासाठी सरकारने या घोषणा केल्या आहेत. 16 सप्टेंबर 2023 रोजी सरकारने मराठवाडा मुक्तीसंग्रामासाठी जाहीर केलेल्या पॅकेजनंतर किती निधी आला याचा अभ्यास करावा लागेल. अनेक घोषणा करुन जनतेची दिशाभूल करणारे, हे सरकार असल्याचे त्यांनी सांगितले. मुक्तीसंग्रामाच्या निमित्ताने सरकारने केलेल्या घोषणा या पूर्णतः फसव्या असून, त्यातील एक टक्का देखील काम सुरू झाले नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला. निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासने न पाळल्याने जनतेत मोठ्या प्रमाणात रोष असून, त्याचे परिणाम येणार्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दिसून येतील, असा इशारा अंबादास दानवे यांनी यावेळी दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List