Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांचे मंत्रिमंडळात कमबॅक, मंत्रिपदाची घेतली शपथ
Chhagan Bhujbal Oath ceremony: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी आज राजभवनमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ यांना स्थान देण्यात आले. छगन भुजबळ यांना पुन्हा अन्न व नागरी पुरवठा खाते देण्यात येण्याची शक्यता आहे. तिसऱ्यांदा भुजबळ यांच्याकडे या खात्याची सूत्र जाणार आहे. दरम्यान, आता थोड्याच वेळात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यात भुजबळ मंत्री म्हणून सहभागी होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांचा समावेश झाला नव्हता. त्यामुळे छगन भुजबळ प्रचंड नाराज झाले होते. त्यांनी उघडपणे आपली नाराजी अनेक वेळा व्यक्त केली होती. मंत्रिपद न मिळाल्यामुळे भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वापासून आणि पक्षीय घडामोडींपासून लांब राहिलेले दिसत होते. आता त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
सात दिवसांपूर्वी झाला निर्णय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सात दिवसांपूर्वीच छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्री करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यासंदर्भातील निर्णय भुजबळ यांना कळवला होता. छगन भुजबळ यांनी त्याला दुजोरा देत आपणास एका ओळीचा संदेश मिळाल्याचे सांगितले. दरम्यान, सुनील तटकरे यांनी सांगितले की, राष्ट्रवादीची एक जागा रिक्त होती. त्या जागेवर छगन भुजबळ यांना संधी दिल्याये सांगितले.
भुजबळांना का मिळाले मंत्रिपद?
छगन भुजबळ अचानक चर्चेत का आले? यावर चर्चा सुरु झाली आहे. भुजबळ ओबीसी नेते आहेत. ओबीसी समाजावर त्यांचा प्रभाव आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात महापालिका, नगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. त्याकाळात भुजबळांना नाराज ठेवणे राष्ट्रवादी काँग्रेसला परवडणारे नाही. यामुळे भुजबळांना मंत्री करण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List