मुंबई खड्ड्यात! पावसाळा तोंडावर, पण काम अवघे 25 टक्के झालेय!
दोन वर्षांत मुंबईतील सर्व रस्ते काँक्रिटीकरण करू अशा गमजा मारलेल्या मिंधे सरकारचा दावा सपशेल फोन ठरला असून तिसऱ्या वर्षी 25 टक्के कामेही पूर्ण झालेली नाहीत. यातच पावसाळा तोंडावर आला असताना ठिकठिकाणी रस्त्यांवर खड्डे असल्याने वाहनचालक, पादचाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. यातच 31 मेनंतर कोणतेही काम करू नये असे आदेश आयुक्तांनी कंत्राटदारांना दिल्याने अर्धवट कामांमुळे यावर्षीचा पावसाळादेखील खड्ड्यातच जाणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत सुमारे 2 हजार किमीचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर पावसाळ्यात दरवर्षी खड्डे पडत असल्याने सामान्य नागरिकांसह प्रवासी, वाहतूकदारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. विशेष म्हणजे दरवर्षी या कामासाठी कोट्यवधीचा खर्च केला जात असताना प्रत्येक वर्षी खड्डे पडत असल्याने सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रिटीकरणाचा निर्णय घेतला आहे. मात्र तिसऱ्या वर्षीदेखील ही कामे अर्धीदेखील झालेली नाहीत.
असे होतेय काम
- मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईतील 2121 रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात एकूण 700 रस्त्यांचे काम (320.62 किमी) सुरू करण्यात आले.
- तर दुसऱ्या टप्प्यात 1421 रस्त्यांचे काम (378.91 किमी) फेब्रुवारी 2025 पासून हाती घेण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात 286 रस्त्यांची तर दुसऱया टप्प्यात 708 रस्त्यांची कामे रस्त्यांची कामे सुरू आहेत.
- 18 मेपर्यंत एकूण रस्त्यांपैकी 479 रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यातील 304 तर दुसऱ्या टप्प्यातील 175 रस्त्यांचा समावेश पूर्ण झालेल्या कामात आहे.
31 मेपर्यंत होणार काम
पालिका प्रशासनाने रस्ते कंत्राटदारांना दिलेल्या आदेशानुसार 31 मेपर्यंत पहिल्या टप्प्यातील 700 रस्त्यांची 75 टक्के कामे, तर दुसऱया टप्प्यातील 1421 रस्त्यांची 50 टक्के कामे पूर्ण करावी लागणार आहेत.
सत्ताधाऱ्यांकडूनच पोलखोल
एकीकडे तत्कालीन मिंधे सरकारने तीन वर्षांपूर्वी सर्व रस्ते काँक्रिटीकरण करून मुंबईकरांचा प्रवास खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली असताना तिसऱ्या वर्षीदेखील रस्त्यांची दुरवस्था आहे. याच पार्श्वभूमीवर आज उपनगरचे पालकमंत्री खुद्द अॅड. आशीष शेलार यांनी तिसऱ्यांदा रस्त्यांची पाहणी केली. पावसाळा तोंडावर आला असताना अनेक रस्ते अजूनही खोदून ठेवलेलेच आहेत. अनेक कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे मोठी वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे खोदून ठेवलेले रस्ते डांबरीकरण करून वाहतुकीसाठी खुले करा, असे निर्देश शेलार यांनी पालिकेला दिले. तसेच सध्या लावण्यात आलेले दुभाजक हटवा, डेब्रिज, खडी, माती तातडीने हटवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List