ते मला वेश्या म्हणायचे..; वडिलांच्या त्रासाबद्दल अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
अभिनेत्री शाइनी दोशीने 2013 मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या ‘सरस्वतीचंद्र’ या मालिकेतून हिंदी टीव्ही क्षेत्रात पाऊल ठेवलं. यानंतर तिने ‘सरोजिनी- एक नई पहल’, ‘बहु हमारी रजनीकांत’, ‘जमाई राजा’, ‘पंड्या स्टोर’ यांसारख्या मालिकांमधून ती लोकप्रिय झाली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाइनी तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. किशोरवयात असताना आलेल्या वाईट अनुभवांविषयी तिने या मुलाखतीत सांगितलं. शाइनीचे वडील कुटुंबाला एकटं सोडून गेले होते. त्यामुळे तिला कमी वयातच काम करावं लागलं होतं. हा केवळ आर्थिक भार नव्हता, तर त्यासोबत अनेक बोलणीसुद्धा ऐकावी लागली होती, असं ती म्हणाली.
आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत शाइनीने सांगितलं, “माझे वडील मला वेश्या म्हणायचे. अहमदाबादमध्ये कधी कधी माझं शूटिंग पहाटे दोन – तीन वाजेपर्यंत सुरू असायचं. माझी आई नेहमी माझ्यासोबत असायची. तेव्हा मी फक्त 16 वर्षांची होती. पण जेव्हा आम्ही घरी यायचो, तेव्हा आम्ही सुरक्षित आहोत का, ठीक आहोत का असे प्रश्न विचारण्याऐवजी माझे वडील आईवर खूप घाणेरडे आरोप करायचे. तू तुझ्या मुलीला रात्री 3 वाजता बाहेर घेऊन जात आहेस? तू तिला वेश्या बनवतेयस का? हे शब्द माझ्या मनावर कायमचे कोरले गेले आहेत. आजही त्या गोष्टी आठवल्या की मला खूप वाईट वाटतं.”
“आयुष्यात काही नात्यांच्या गाठी अशा असतात, ज्या तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी सुटत नाहीत. मी या गोष्टींकडे धडा म्हणून पाहते. पण आजही कधी कधी मी खूप खचते. माझ्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणारा पिता मला कधीच भेटला नाही. मी तुझ्यासोबत आहे, तुला काही मदत लागली तर सांग.. असं कधीच मी त्यांच्याकडून ऐकलं नाही”, अशा शब्दांत शाइनी व्यक्त झाली. शाइनीच्या वडिलांचं 2019 मध्ये अमरनाथ यात्रेदरम्यान निधन झालं.
शाइनीचे कुटुंबीय जुन्या विचारसरणीचे किंवा रुढीवादी असल्याने सुरुवातीच्या काळात तिला बऱ्याच टीकांचा सामना करावा लागला होता. शाइनीच्या कामाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन चांगला नव्हता. याविषयी ती पुढे म्हणाली, “सरस्वतीचंद्र या मालिकेनंतर गुजरातमधील माझे नातेवाईक माझी प्रशंसा करू लागले होते. माझ्या कुटुंबात असे अनेकजण होते, जे मला वेश्या म्हणायचे. अभिनेत्री म्हणून काम करणं म्हणजे वेश्याच असं त्यांना वाटायचं. त्यांची विचारसरणी खूप जुनी आहे. पण काही मालिकांनंतर कदाचित काही लोकांचं तोंड बंद झालं.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List