लाज वाटली पाहिजे तुला..; थायलँड ट्रिपवर गेलेल्या भारती सिंहवर का भडकले नेटकरी?
भारत-पाकिस्तानदरम्यान तणावाचं वातावरण असताना थायलँडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेणाऱ्या कॉमेडियन भारती सिंहला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. देशात संघर्षाचं वातावरण असताना आणि विशेष म्हणजे कुटुंबीय अमृतसरमध्ये तणावात असताना भारती परदेशात फिरायला गेल्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली. त्यावर आता तिने रडत-रडत तिची बाजू मांडली आहे. भारतीने तिच्या युट्यूब चॅनलवर एक व्लॉग पोस्ट करत या सर्व गोष्टीवर स्पष्टीकरण दिलं आहे. यामध्ये ती नेटकऱ्यांच्या तिखट प्रतिक्रिया वाचून दाखवताना भावूक होते. ‘तुला लाज वाटली पाहिजे, तुझं सर्व कुटुंब अमृतसरमध्ये आहे, इथे देश तणावात आहे आणि तू थायलँडला फिरतेय’, अशा प्रतिक्रिया तिने वाचून दाखवल्या आहेत. दुसरीकडे भारतीच्या कुटुंबीयांना अमृतसरमध्ये अनिश्चिततेचा सामना करावा लागतोय.
या व्लॉगमध्ये भारती म्हणते, “माझे सर्व कुटुंबीय सुरक्षित आहेत. शहर आणि देशात सध्या तणावाचं वातावरण असलं तरी माझे कुटुंबीय सुरक्षित आहेत. मला माझ्या देशावर आणि सरकारवर पूर्ण विश्वास आहे. भारत एक मजबूत राष्ट्र आहे आणि त्याला कोणीच धक्का पोहोचवू शकत नाही. जेव्हा मी तुमचे कमेंट्स वाचते, तेव्हा मला राग येत नाही. मला इतकंच वाटतं की तुम्ही खूप भोळे आहात. मी सर्वांना हे स्पष्ट करू इच्छिते की मी थायलँडला एका कामासाठी आली आहे. इथे मी सुट्ट्यांचा आनंद घ्यायला आले नाही. आमच्याकडे दहा दिवसांचं शूटिंग होतं आणि या प्रोजेक्टसाठी आम्ही तीन-चार महिन्यांपूर्वीच होकार दिला होता. त्यामुळे कामाप्रती असलेली वचनबद्धता आम्हाला पाळावी लागेल. त्यासाठी बरीच तयार झाली होती, पैसे खर्च झाले होते.”
या व्हिडीओमध्ये बोलताना भारतीला अश्रू अनावर होतात. “मला माझ्या देशाची आणि कुटुंबाची पर्वा नाही, असे कमेंट्स नेटकरी करतात. परंतु दिवसातून दोन ते तीन वेळा मी त्यांच्याशी संपर्क साधून सर्वकाही अपडेट्स जाणून घेत असते. खोट्या बातम्या वाचून मलासुद्धा चिंता होते. मलाही खूप रडायला येतं. मी अशा कमेंट्सकडे दुर्लक्ष करू शकत नाही. मी पुन्हा हेच सांगू इच्छिते की मला माझ्या देशावर आणि सरकारवर पूर्ण विश्वास आहे. या कठीण काळातसुद्धा माझे कुटुंबीय मला प्रेरणा देत आहेत”, असं ती पुढे म्हणाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List