ट्रम्प यांची घुसखोरी! युद्ध थांबवलं आता कश्मीर प्रश्नात लक्ष घालणार
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेले युद्ध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने थांबले, परंतु ट्रम्प यांनी आता कश्मीरसारख्या संवेदनशील मुद्दय़ाला हात घातला असून कश्मीर प्रश्नात तोडगा काढणार, असे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या या ‘घुसखोरी’मुळे हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वाला धक्का बसला असून विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरले आहे. ट्रम्प यांच्या मध्यस्थीने आपण युद्धविराम केला. आता त्यांनी कश्मीर प्रश्नात लक्ष घालून व्यापार वाढवण्याचा संकल्प केला आहे. या सगळय़ाचा नेमका अर्थ काय, असा सवाल करतानाच तातडीने सर्वपक्षीय बैठक आणि संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी विरोधकांनी केली.
आज सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टथवर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्ट लिहिली. दिल्ली आणि इस्लामाबादच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. तसेच या ऐतिहासिक व धाडसी निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी अमेरिका सक्षम होती, असे त्यांनी म्हटले. हिंदुस्थान व पाकिस्तानच्या मजबूत आणि शक्तिशाली नेतृत्वाचा मला अभिमान आहे. कारण त्यांच्याकडे शक्ती, बुद्धी आणि धैर्य आहे. दोन्ही देशांनी आक्रमता सोडण्याची वेळ आली आहे. जर युद्ध थांबले नसते तर लाखो निरपराध लोकांचा बळी गेला असता, असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
ट्रम्प यांचे हे षड्यंत्र – काँग्रेस
कश्मीरप्रश्नी तोडगा काढणारे ट्रम्प कोण, असा सवाल काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. सरकारने कश्मीरप्रश्नी त्रयस्थाची मध्यस्थी स्वीकारली आहे. पाकिस्तानसोबत मिळून हिंदुस्थानविरोधात षड्यंत्र रचले जात आहेत का? असा आरोप रमेश यांनी केला.
कश्मीर बायबलमधील हजार वर्ष जुना संघर्ष नाही
कश्मीर हा काही बायबलमधील हजार वर्ष जुना संघर्ष नाही. हा संघर्ष केवळ 78 वर्षे आधी सुरू झाला, अशा शब्दांत काँग्रेसने कश्मीरप्रश्नी ट्रम्प यांच्या घुसखोरीबद्दल संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी कश्मीर मुद्दय़ावरून ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. कश्मीर संघर्षाची सुरुवात 22 ऑक्टोबर 1947 पासून सुरू झाली. हे अमेरिकेतीलच कुणीतरी ट्रम्प यांना सांगायला हवे. महाराजा हरि सिंह यांनी 26 ऑक्टोबर 1947 रोजी कश्मीर हिंदुस्थानच्या हवाली केले. पाकव्याप्त कश्मीरचाही त्यात समावेश होता. ही गोष्ट समजणे इतकी कठीण आहे का? असा सवाल मनीष तिवारी यांनी केला आहे.
संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा राहुल गांधी, खरगेंचे मोदींना पत्र
ऑपरेशन सिंदूर आणि शस्त्रसंधीबाबत तातडीने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आज केली.
हजार वर्षे जुना प्रश्न!
मी हिंदुस्थान आणि पाकिस्तानसोबत कश्मीर मुद्दय़ावर चर्चा करण्यास तयार आहे. हा प्रश्न हजार वर्षे जुना आहे. त्यावर तोडगा काढण्याचा मी प्रयत्न करेन, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी नमूद केले. तुमची परंपरा, संस्कृती तुमच्या साहसी कार्यांपेक्षा खूप मोठी आहे. कश्मीर प्रश्नी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी अमेरिका सक्षम होती. परंतु अशी चर्चा झाली नाही, असे नमूद करतानाच देव हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाला चांगले काम करण्यासाठी आशीर्वाद देवो, असे ट्रम्प म्हणाले. हिंदुस्थान आणि पाकिस्तानसोबत व्यापार वाढवायचा आहे, मिळून काम करायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List