वानखेडेवरची कसोटी अखेरची ठरतेय… दै. ‘सामना’ने गेल्याच वर्षी वर्तवले होते भाकीत
गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा फॉर्म पाहता वानखेडेवर खेळला गेलेला कसोटी सामना या महान खेळाडूंचा मायदेशातील अखरेचा कसोटी सामना असेल, अशी शक्यता दै. ‘सामना’ने सहा महिन्यांपूर्वी वर्तवली होती. आता ती शक्यता तंतोतंत सत्यात उतरतेय. हिंदुस्थानचा कर्णधार रोहित शर्माने आपली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय, तर विराट कोहलीनेही आगामी इंग्लंड दौऱ्यापूर्वीच कसोटी निवृत्तीची इच्छा व्यक्त केल्यामुळे वानखेडे कसोटीच त्यांची मायदेशातील अखेरची कसोटी ठरू शकते.
गेल्या वर्षी न्यूझीलंडचा नवखा आणि दुबळा संघ हिंदुस्थानात 3-0 ने मार खाण्यासाठी आला असल्याचे सारेच म्हणत होते. पण रोहितच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या हिंदुस्थानी संघाचा टॉम लॅथमच्या संघाने 3-0 असा लाजीरवाणा पराभव केला होता. हिंदुस्थानने पहिल्या दोन कसोटी सामन्यांत दारुण हार सहन केल्यानंतर वानखेडेवर ते आपली उरलीसुरली वाचवण्यासाठी उतरले होते. या मालिकेत रोहित शर्मा फलंदाज आणि कर्णधार म्हणून लाचार दिसला होता, तर विराट कोहलीच्या फलंदाजीचा फॉर्मही हवेत विरून गेला होता. त्यामुळे वानखेडेनंतर हिंदुस्थानचे रोहित-वीरू पुन्हा मायदेशात खेळण्याची शक्यता फारच कमी होती. फक्त ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्यांनी धावांचा पाऊस पाडताना मालिका जिंकण्याचा पराक्रम केला असता तर त्यांची कारकीर्द काही कसोटींसाठी वाढण्याची शक्यता होती. पण ऑस्ट्रेलियातही दोघे अपयशी ठरले आणि हिंदुस्थानी संघाला आणखी एक मालिका पराभव सहन करावा लागला होता.
ऑस्ट्रेलिया 3-1 मार खाल्ल्यानंतर रोहित शर्माकडून साऱयांनाच निवृत्तीची अपेक्षा होती. पण त्याने मौन पाळत आपल्या कारकीर्दीला जीवदान देण्याचा प्रयत्न केला होता, पण हा प्रयत्न चालला नाही. अखेर आगामी इंग्लंड मालिकेपूर्वी रोहितने बीसीसीआयशी काही गणिते न जुळल्यामुळे निवृत्ती पत्करणेच योग्य असल्याचे सांगितले. रोहित निवृत्त होत नाही, तोच विराट कोहलीनेही शनिवारी आपल्याली कसोटी निवृत्तीची इच्छा व्यक्त केली. विराटची ही इच्छा फेटाळून लावली तर इंग्लंडमध्ये आपल्या कसोटी कारकीर्दीला अखेरचा निरोप देईल, असेही अंदाज बांधले जात आहेत. एवढेच नव्हे तर येत्या ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध अहमदाबाद आणि इडन गार्डन्स या मोठय़ा स्टेडियमवर कसोटी सामने खेळले जाणार आहेत. जर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत हिंदुस्थानी संघाला दणदणीत यश मिळवता आले तर विराटची कसोटी कारकीर्द मायदेशात पोहोचेल आणि त्याच्या महान कारकीर्दीला मायभूमीतील मैदानांवर मानाचा मुजरा करता येईल. तूर्तास विराट कोणता निर्णय घेतो?याची लवकरच सर्वांना माहिती मिळेल.
विराट कोहली निवृत्तीचा निर्णय बदलणार?
विराट कोहलीने कसोटीतून निवृत्तीची इच्छा बीसीसीआयकडे व्यक्त केली असली तरी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने खेळावे, यासाठी त्याची मनधरणी केली जात आहे आणि बीसीसीआय विराटला आपला कसोटी निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यास राजी करेल, असा विश्वास क्रिकेटतज्ञांनी व्यक्त केला आहे. रोहित शर्माने चार दिवसांपूर्वी कसोटीतून निवृत्ती पत्करली. पण कसोटी क्रिकेटची कारकीर्द पाहता रोहित आणि विराटमध्ये जमीन-अस्मानाचे अंतर आहे. आता जून-जुलै महिन्यात हिदुस्थानचा संघ इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत विराट कोहलीच्या अनुभवाची संघाला नितांत गरज आहे. त्यामुळे संघहितासाठी विराटची मनधरणी करून त्याला इंग्लंडविरुद्धची मालिका खेळण्यास बीसीसीआय प्रयत्नशील आहे. तसेच जर इंग्लंडविरुद्ध विराटला सूर गवसला तर त्याला मायदेशात सन्मानाने निवृत्तीचा इव्हेंटही बीसीसीआय आयोजित करू शकते. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकन संघ दोन-दोन कसोटी सामन्यांच्या मालिका खेळणार आहेत. यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कसोटी सामना कोहलीच्या घरच्या म्हणजेच दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळविला जाणार आहे. 12 वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरलाही बीसीसीआयने वानखेडेवर निवृत्ती कसोटी खेळण्याची संधी दिली होती. तशीच संधी विराटलाही मिळू शकते. तीसुद्धा जर त्याची इच्छा असेल तर.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List