सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेत उत्तरपत्रिका तपासायला ‘एआय’ची मदत, हार्वर्ड विद्यापीठातील इनोव्हेशन लॅबचे मिळाले सहकार्य
ग्लोबल टीचर पुरस्कारविजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांच्या प्रश्नपत्रिका तपासण्यासाठी ‘हॅक द क्लासरूम’ नावाचे एआय मॉडल गुगल जेमिनीच्या मदतीने तयार केले आहे. हे मॉडेल मराठी भाषेतून प्रश्नपत्रिका तयार करणे आणि त्यांची तपासणी करण्याच्या हेतूने निर्माण करण्यात आले आहे. हार्वर्ड विद्यापीठातील इनोव्हेशन लॅबचे याकरिता विशेष सहकार्य मिळाले असून, या एआय मॉडेलची प्राथमिक चाचणी करण्यात आली.
सोलापूर जिह्यातील बारा जिल्हा परिषद शाळांमधील 225 विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेच्या उत्तरपत्रिका ‘एआय’च्या मदतीने तपासून अंतिम निकाल लावण्याचा संशोधन प्रकल्प नुकताच पूर्ण केला. या प्रयोगात 225 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका संबंधित वर्गाचे शिक्षक व एआय अशा दोन्ही पद्धतीने तपासण्यात आल्या. एआयच्या माध्यमातून तपासण्यात आलेल्या उत्तरपत्रिकांमधून 12 टक्के मुलांच्या गुणात बदल झाल्याचे दिसून आले. हे बदल संबंधित शिक्षकांच्या तपासणीत अचूक असून 20 गुणांची एक उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षकांना सरासरी 1 मिनिट 42 सेकंड, तर 50 गुणांची उत्तरपत्रिका तपासण्यासाठी 5 मिनिटे 27 सेपंद इतका वेळ शिक्षकांना लागला. मात्र, ‘एआय’ने हेच काम 32 सेकंदांत पूर्ण केले. ‘एआय’ने तपासलेल्या उत्तरपत्रिकांची अचूकता 95 टक्के इतकी नोंदवण्यात आली. 5 टक्के विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर ओळखण्यात या एआय मॉडलला अपयश आले.
या वर्षी उत्तरपत्रिका तपासणे आणि अंतिम निकाल तयार करणे, याकरिता शिक्षकांकडे पुरेसा वेळ नव्हता. त्यामुळे ‘एआय’चा वापर करून उत्तरपत्रिका तपासण्याचा प्रयोग करण्यात आला. छोट्या गटावर करण्यात आलेल्या या प्रयोगाचे निकाल उत्साहवर्धक आहेत. यामुळे हे एआय मॉडेल अधिक सक्षम बनवण्यासाठी मदत होईल.
– रणजितसिंह डिसले
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List