सुपरस्टार असल्याचा तोरा..; शाहरुखबद्दल काय म्हणाले अशोक सराफ?
मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी हिंदीतही जवळपास चाळीसहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. राकेश रोशन यांच्या ‘करण अर्जुन’ आणि ‘कोयला’ या दोन चित्रपटांमध्ये त्यांनी शाहरुख खानसोबत भूमिका साकारली होती. शिवाय ‘गुड्डू’ आणि ‘येस बॉस’मध्येही शाहरुख आणि अशोक सराफ यांनी एकत्र काम केलं होतं. ‘मी बहुरूपी’ या आत्मचरित्रात त्यांनी शाहरुखसोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी लिहिलं आहे. शाहरुखची इंटेन्सिटी वाखाणण्याजोगी आहे, अशा शब्दांत त्यांनी कौतुक केलं. एखाद्या सीनची कितीही तालीम करण्याची त्याची तयारी असते. तालीम नीट झाली आणि दिग्दर्शकानं टेक करू असं म्हटल्यानंतरही आपण आखी एक रिहर्सल हवी असं सुचवलं की लगेच, ‘अच्छा, तो फिर और एक बार रिहर्स करते है’ असं म्हणून तो तयार होत असे, असं ते सांगतात.
‘काम करताना शाहरुखच्या चेहऱ्यावर किंचितही नाराजी दिसत नाही. दहा-बारा रिहर्सल झाल्यानंतरही आपण एखादी चूक काढली तरी ‘क्या बात करते हो? ऐसा हुआ क्या?’ असं म्हणून तो नव्याने तालमीला तयार असायचा. सगळ्यांच्या मनासारखी रिहर्सल झाली की मगच टेक घ्यायचा. शाहरुखला थकणं हे माहीत नाही,’ अशा शब्दांत अशोक सराफ यांनी त्याच्या मेहनतीची दाद दिली. समोरच्याला काय म्हणायचं आहे हे तो शांतपणे ऐकून घेतो. कोणतीही सूचना तो झिडकारून टाकत नाही. चित्रपटाच्या भल्यासाठी जे असेल ते सगळं स्वीकारतो. कितीही रिटेक झाले तरी त्याची इंटेन्सिटी तीच असते.
शाहरुखच्या स्वभावातील शोधक, शिकायची वृत्ती आणि दुसऱ्या कलाकारांविषयी प्रचंड आदर या गोष्टींचं अशोक सराफ यांनी विशेष कौतुक केलं. विशेष म्हणजे शाहरुखची ही वृत्ती आजही कायम असल्याचं ते सांगतात. आताही सेटवर तो तितकीच मेहनत घेतो आणि रिहर्सल करण्याच्या बाबतीत तेवढाच आग्रही असतो. सुपरस्टार असल्याचा तोरा त्याच्या वागण्यात जराही दिसत नसल्याचं, अशोक सराफ यांनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हटलंय.
अशोक सराफ यांनी शाहरुखला कधीच सेटवर कोणाशी गॉसिप करताना ऐकलेलं नाही. सेटवर आपल्या सहकाऱ्यांचं बोलणं गंभीरपणे ऐकणारा आणि त्यावर विचार करणारा कलावंत.. असं त्यांनी किंग खानचं वर्णन केलंय. हिंदी चित्रपटसृष्टीत कोणीही गॉडफादर नसताना शाहरुखने टीव्ही मालिकांमध्ये काम करून कारकिर्दीला सुरुवात केली. सर्वसाधारणपणे अशा अभिनेत्याला हिंदी चित्रपटसृष्टीत इतकं मोठं यश मिळेल असं कधी कोणाला वाटलं नसेल. केवळ आपल्या मेहनतीच्या जोरावर शाहरुखने आज आपलं स्थान पक्कं केलंय. कोणीही नट उगीचच यशस्वी होत नाही, हे त्याच्याकडे बघून शिकायला हवं, असं अशोक सराफ ठामपणे सांगतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List