‘अलमट्टी’च्या उंचीवाढीस कोल्हापूर, सांगलीकरांचा विरोध,18 मे रोजी अंकली नाक्यावर ‘चक्का जाम’चा एकमुखी निर्णय
कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या वाढविण्यात येणाऱ्या उंचीचा फटका नागरी वस्त्यांना मोठय़ा प्रमाणात बसणार आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याबरोबर रस्त्यावरदेखील आक्रमकपणे लढा देण्याचा निर्णय अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात झालेल्या सर्वपक्षीय मेळाव्यात घेण्यात आला. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून येत्या 18 मे रोजी अंकली नाक्यावर चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आमदार सतेज पाटील यांनी जाहीर केले.
दरम्यान, अलमट्टीची उंची वाढवण्याबाबत पेंद्र सरकारने अधिसूचना काढू नये, या मागणीसह अलमट्टी उंचीच्या विरोधात महाराष्ट्र सरकारला जागे करून संघटित ताकदीचा परिणाम दाखवून देऊ या. राज्य सरकार आपल्यासोबत असेल तर कर्नाटकच्या अलमट्टीवर जाण्यालासुद्धा कोल्हापूर आणि सांगलीवाले कमी पडणार नाहीत, असा इशाराही देण्यात आला. अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिह्यांतील सर्वपक्षीय शेतकरी, व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक, दुकानदार आणि पूरबाधित लोकांचा मेळावा आज पृषी उत्पन्न बाजार समिती, मार्पेट यार्ड येथील सभागृहात झाला.
यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले, अलमट्टीची उंची वाढवण्याविरोधातील महाराष्ट्र सरकारची विरोधातील भूमिका ऑन रेकॉर्ड कुठेही नाही. अलमट्टी धरणाची उंची तीन मीटरने वाढवल्यास कर्नाटक सरकारला 1 लाख 33 हजार एकर जमीन संपादित करावी लागणार आहे. याशिवाय कोल्हापूर आणि सांगलीमध्ये महापुराची परिस्थिती आणखी भीषण होणार आहे. त्यामुळे अलमट्टी उंची विरोधातील आपला लढा कायमस्वरूपी सुरू ठेवूया, असे आवाहन त्यांनी केले. तसेच अलमट्टीची उंची वाढवण्याबाबत पेंद्र सरकारने अधिसूचना काढू नये, अशी मागणीही त्यांनी केली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कोल्हापूर सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले, आता ही ‘आर-पार’ची लढाई असून, ‘नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही,’ याप्रमाणे कर्नाटकची परिस्थिती आहे. प्रशासनातील अधिकारी योग्य पद्धतीने नियोजन करत नाहीत. महाराष्ट्र सरकारला आता जागे केले पाहिजे. कर्नाटक सरकारचे नरडे धरल्याशिवाय ते ऐकणार नाहीत, त्यामुळे आता रस्त्यावर उतरून आक्रमक होऊया, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी खासदार धैर्यशील माने म्हणाले, अलमट्टी धरणाबाबत दोन राज्यांच्या कार्यरत असलेल्या दोन्ही समितींनी योग्य समन्वय राखण्याची गरज आहे. अलमट्टीबाबत संसदेत प्रश्न उपस्थित करू, असे त्यांनी सांगितले.
2019च्या महापुरात 1500 कोटींचे नुकसान
महापूर आला की व्यावसायिकांचे मोठे नुकसान होते. 2019मध्ये आलेल्या महापुरामुळे 1400 ते 1500 कोटींचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आणून देत कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी, महाराष्ट्र राज्य एरिगेशन फेडरेशनच्या माध्यमातून अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात उभारलेल्या सर्वपक्षीय लढय़ात सर्व व्यापारी, उद्योजक असतील, अशी ग्वाही दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List