अमेरिकेतील अल्काट्राझ तुरुंग पुन्हा उघडणार, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नुकतेच सत्तेत येऊन 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या शंभर दिवसांत ट्रम्प यांनी सर्वांना चक्रावून सोडणारे निर्णय घेतले आहेत. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे संपूर्ण जगाला धडकी भरली असताना आता त्यांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प अल्काट्राझ तुरुंग पुन्हा सुरू करणार आहेत. हा तुरुंग सर्वात धोकादायक तुरुंग म्हणून ओळखला जात आहे. अल्काट्राझ तुरुंग 62 वर्षांपासून बंद आहे, परंतु हा तुरुंग पुन्हा उघडला जाणार असून सर्वात धोकादायक गुन्हेगारांना येथे ठेवले जाईल, असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेतील न्याय विभाग, एफबीआय आणि होमलँड सिक्युरिटीला अल्काट्राझची पुनर्बांधणी करण्यासाठी एकत्र काम करण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेने अलीकडेच मध्य अमेरिकन देश एल साल्वाडोरसोबत हिंसक गुन्हेगार आणि बेकायदेशीर स्थलांतरितांना आश्रय देण्यासाठी करार केला आहे.
हा तुरुंग सर्वात कठीण तुरुंगांपैकी एक मानला जातो. या तुरुंगाला ‘द रॉक’ असेही म्हणतात. हा कॅलिपहर्नियातील सॅन फ्रान्सिस्को खाडीतील एका बेटावर आहे. या तुरुंगात इटालियन-अमेरिकन माफिया डॉन अल कॅपोन, कुख्यात गुंड जॉर्ज ‘मशीन गन’ केली, रॉबर्ट स्ट्राऊड होते. हा तुरुंग 1934 ते 1963 पर्यंत वापरात होता. जास्त खर्च आणि देखभालीच्या समस्यांमुळे तो बंद करण्यात आला. या तुरुंगातून चार कैदी पळाले होते. या कैद्यांनी चमच्याने आणि ड्रिलने त्यांच्या कोठडीत खोदकाम केले आणि त्या भुयारातून पळून गेले होते, असे सांगितले जाते.
विदेशी सिनेमांवर 100 टक्के टॅक्स
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील चित्रपटसृष्टी आणखी मजबूत करण्यासाठी अमेरिकेबाहेरील चित्रपटांवर 100 टक्के टॅक्स लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अमेरिकेत प्रदर्शित होणाऱ्या अन्य देशांच्या चित्रपटांना 100 टक्के टॅक्स द्यावा लागणार आहे. अमेरिकेबाहेरील चित्रपट हे देशासाठी धोका असून चित्रपट हे अमेरिकेतच बनवले जावेत, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्या या निर्णयावर चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी टीका केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List