‘वयानं छोटी, दिसायला लहानखोर..’; अशोक सराफांनी सांगितला निवेदिता यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा
दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी 1990 मध्ये लग्न केलं. या दोघांच्या वयात 18 वर्षांचं अंतर आहे. अशोक सराफ यांचा जन्म 1947 मध्ये तर निवेदिता यांचा जन्म 1965 मध्ये झाला. या दोघांची प्रेमकहाणी तर अनेकांना माहितच असेल. परंतु त्यांची पहिली भेट कशी झाली, हे तुम्हाला माहीत आहे का? अशोक सराफ यांनी त्यांच्या ‘मी बहुरुपी’ या आत्मचरित्रात या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. ‘डार्लिंग डार्लिंग’ या नाटकादरम्यान या दोघांची पहिली भेट झाली होती. या नाटकामध्ये गजन जोशी म्हणजेच निवेदिता यांचे वडीलसुद्धा काम करायचे. अशोक सराफ आणि गजन जोशी हे एकमेकांचे चांगले मित्र होते. या नाटकाचा प्रयोग जेव्हा शिवाजीमंदिरात झाला, तेव्हा निवेदिता तिथे आल्या होत्या.
‘निवेदिता तेव्हा वयानं छोटी होतीच, पण दिसायलाही लहानखोर’, असं वर्णन अशोक सराफांनी या आत्मचरित्रात केलंय. “ही माझी मुलगी. तुला भेटायला आलीये”, असं म्हणत गजन जोशी यांनी निवेदिताची अशोक सराफांशी ओळख करून दिली. नंतर भविष्यात तीच बायको होणार आणि गजन त्यांचे सासरे होणार याची अशोक सराफ यांना त्यावेळी पुसटशीही कल्पना नव्हती. अशोक सराफ यांचा ‘दोन्ही घरचा पाहुणा’ हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला होता, तेव्हा निवेदिता फक्त सहा वर्षांच्या होत्या.
अशोक सराफ आणि निवेदिता यांनी ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘अशी ही बनवाबनवी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. चित्रपटांमध्ये एकत्र काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. जेव्हा या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा वयातील अंतरामुळे सुरुवातीला कुटुंबीयांनी विरोध केला. शिवाय आपल्या मुलीने सिनेसृष्टीतील मुलाशी लग्न नये, अशी त्यांच्या आईची इच्छा होती. परंतु, निवेदिता यांची मोठी बहीण डॉ. मीनल परांजपे यांनी पुढाकार घेऊन कुटुंबीयांकडून लग्नासाठी परवानगी मिळवली. अखेर अशोक सराफ आणि निवेदता यांनी गोव्यातील मंगेशी देवळात लग्नगाठ बांधली. अशोक सराफ यांचे ते कुलदैवत असल्याने दोघांनी तिथेच लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांना एक मुलगा असून त्याचं नाव अनिकेत असं त्याचं नाव आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List