सामना अग्रलेख – इतिहास घडवण्याची संधी गमावली!

सामना अग्रलेख – इतिहास घडवण्याची संधी गमावली!

पंतप्रधान मोदी हे आमचे व्यक्तिगत शत्रू नाहीत, पण ते शिवसेनेचे म्हणजे शिवरायांच्या महाराष्ट्राचे शत्रू आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांची शिवसेना त्यांनी एका द्वेषाने फोडली. महाराष्ट्र हे लक्षात ठेवेल. नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी आत्ममग्नता सोडून आत्मचिंतन करावे असे आम्ही सुचवत आहोत. त्यांना इतिहास घडविण्याची संधी होती, पण सर्व कालखंड थिल्लर राजकारणात घालवून श्री. मोदी यांनी महान संधी गमावली!

पंतप्रधान मोदी हे 75 वर्षांचे झाले. मोदी 75 वर्षांचे झाले म्हणून भारतीय जनता पक्षाचे लोक मोदींचा वाढदिवस साजरा करणार आहेत. आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करणे यात चुकीचे काहीच नाही, पण मोदींचा वाढदिवस जनतेने साजरा करावा, शुभेच्छांचा स्वीकार करावा असे स्वच्छ वातावरण आज देशात राहिले आहे काय? 11 वर्षे मोदी देशाच्या पंतप्रधानपदी आहेत. या 11 वर्षांत आपण देशाला नक्की काय दिले याचे चिंतन मोदी व त्यांच्या अंधभक्तांनी आता तरी करायला हवे. पंतप्रधान म्हणून मोदी यांनी देशातील 80 कोटी जनतेला दरमहा 10 किलो फुकट धान्य दिले व या फुकट धान्याबद्दल ते स्वतःचेच कौतुक करीत असतात. याचा अर्थ 140 कोटी लोकसंख्येच्या देशात 80 कोटी जनता गरिबी रेषेखाली जगत आहे. मोदी त्यांना 10 किलो धान्य देतात म्हणून त्यांची चूल पेटत आहे. हे भारतासारख्या देशाला अभिमानास्पद नाही. मोदी यांचा वाढदिवस ‘बेरोजगार दिवस’ म्हणून साजरा करावा अशी सूचना विरोधी पक्षांतर्फे करण्यात आली आहे. याचा अर्थ ‘आत्मनिर्भर’ भारताची त्यांची घोषणा फुसकी ठरली आहे. गेल्या 10 वर्षांत बेरोजगारीचा महास्फोट झाला. मोदी प्रथम सत्तेवर आले तेव्हा वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे त्यांनी जाहीर केले, पण मागच्या 10 वर्षांत 10 लाख लोकांनाही रोजगार मिळाला नाही. मग रोजगार कोणाला मिळाला? गृहमंत्री अमित शहांचे पुत्र जय शहा यांना एका दिवसात भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष करून बोर्डाचा लाखो कोटींचा निधी त्यांच्या हाती दिला. क्रिकेट धंद्याची सूत्रे जय शहा यांच्या हाती देऊन त्यांना ‘काम’ दिले, पण देशातील कोटय़वधी तरुण आजही बेरोजगार आहेत. आपले मित्र गौतम अदानी हे बोट ठेवतील ती सरकारी कंपनी व जमिनी त्यांना फुकटात देण्यात आल्या. विमानतळे, सरकारी कंपन्या, सरकारी जमिनी अदानी यांना दिल्या. मुंबईसारखी शहरे तर अदानींच्या हाती उदक सोडावे तशी सोडली. महाराष्ट्राच्या तुंगारेश्वर येथील

साडेतीन हजार एकर जमीन

मातीमोल भावात अदानींना दिली. ओडिशातील एक अख्खा जिल्हाच खाण उद्योगासाठी अदानींना दिला. हे पाहून भुवनेश्वर हायकोर्टाला धक्का बसला. बिहारच्या भागलपूरमध्ये 1020 एकर जमीन अदानींना दिली. ही जमीन वर्षाला फक्त एक रुपया दराने 30 वर्षांसाठी दिली. या जमिनीवर 10 लाख आंब्याची झाडे, लिची, सागवान झाडे आज आहेत. हे सर्व आता उद्ध्वस्त केले जाईल. मोदी यांच्या काळात पर्यावरणाचा पुरता विनाश झाला. मोदी यांनी 10 वर्षांत खोटे बोलण्याचा आणि खोटेपणा रेटून नेण्याचा विक्रम केला. मोदी यांनी कोरोना काळात देशात अराजक माजवले. मोदींनी नोटाबंदीचा तुघलकी निर्णय जाहीर करून भारतीय अर्थव्यवस्था रस्त्यावर आणली. जीएसटीसारखे अव्यवहारी निर्णय घेऊन व्यापारी वर्ग आणि जनतेचे कंबरडे मोडले. मोदी काळात भ्रष्टाचाराला मुक्त रान मिळाले. ‘‘न खाऊंगा, न खाने दूंगा’’ या घोषणेचा फुगा त्यांनीच फोडला. भाजपच्या खात्यात देशातील सर्व भ्रष्ट उद्योगपतींनी लाखो कोटी जमा केले. यात बँका व कर बुडवणाऱ्या लोकांचा भरणा जास्त होता. ईडी, सीबीआयने धाडी घातलेले लोक भाजपचे सगळ्यात मोठे देणगीदार आहेत. याच पैशांवर मोदी व त्यांच्या पक्षाने निवडणुका लढवल्या. देशभरातले सर्व महान भ्रष्टाचारी मोदी यांनी भाजपमध्ये घेतले. मोदी यांनी भ्रष्टाचाराबाबत कोणतेही विधिनिषेध पाळले नाहीत. राज्यघटनेच्या सर्व संस्थांवर मोदी व त्यांच्या लोकांनी कब्जा केला. निवडणूक आयोग, न्यायालये, राज्यपाल यांना गुलाम केले. लोकशाही, संसद, विधानसभा यांना मोदी काळात महत्त्व उरले नाही. लोकशाही आणि नागरी स्वातंत्र्याच्या बाबतीत या काळात देशाचे खच्चीकरण झाले. निवडणुका जिंकण्यासाठी धार्मिक उन्माद वाढवणे व त्याच उन्मादावर स्वार होऊन प्रचार करणे हे काम मोदींनी उत्तम केले. कश्मीरचा प्रश्न सोडविण्यासाठी 370 कलम हटवले, पण पुलवामापासून पहलगामपर्यंत निरपराध्यांच्या हत्या थांबलेल्या नाहीत. तरीही

पाकिस्तानबरोबर क्रिकेट

खेळायला लावण्याचा अचाट पराक्रम पंतप्रधान मोदी यांनी आता केला. मणिपुरात मोदी साडेतीन वर्षांनी गेले, पण ते मणिपुरातून बाहेर पडताच मणिपूर पुन्हा पेटले. मोदी यांचे कोणी ऐकत नाही असाच याचा अर्थ. गेली 11 वर्षे केंद्रीय तपास यंत्रणांची दहशत दाखवून पंतप्रधान व त्यांच्या लोकांनी त्यांना हवे ते घडवून आणले. लोकशाहीवादी देशाचे पंतप्रधान म्हणून मोदी यांनी केलेला कारभार हुकूमशाहीला लाजवणारा आहे. देशाने त्यांना संधी दिली. त्यांना इतिहास घडविण्याची संधी होती. इतिहास म्हणजे त्या त्या कालखंडातील त्या त्या लोकांच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक विचारांचे, घडामोडींचे प्रतिबिंब असते. हे प्रतिबिंब भारतात धूसर झाले आहे. मोदी यांनी गुजरातमधल्या प्लॅटफॉर्मवर चहा विकला ही कथा खोटी ठरली. मोदी यांनी बालवयात मगरीशी कुस्ती केली ही गोष्ट खोटी ठरली. मोदी यांनी स्वतःला ‘अवतारी पुरुष’ म्हणून जाहीर केले, पण तेदेखील खोटे ठरले. कारण हा अवतारी पुरुष विरोधकांच्या टीकेनंतर जाहीर सभेत रडू लागतो. मोदी पाकिस्तानचा तुकडा पाडून अखंड भारत निर्माण करणार होते. ते खोटे ठरले. मोदी हा देश आधीपेक्षा सुजलाम सुफलाम, श्रीमंत करणार होते. यापैकी काहीच झाले नाही. मोदी यांनी ‘75 वर्षांनंतर राजकारण्यांनी निवृत्त व्हावे’ अशी पुडी सोडली व त्यानुसार आडवाणींसह अनेकांना सक्तीने निवृत्त केले. आज ते स्वतः 75 वर्षांचे झाले, पण ते स्वतः मात्र खुर्ची सोडायला तयार नाहीत. पंतप्रधान मोदी हे आमचे व्यक्तिगत शत्रू नाहीत, पण ते शिवसेनेचे म्हणजे शिवरायांच्या महाराष्ट्राचे शत्रू आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांची शिवसेना त्यांनी एका द्वेषाने फोडली. महाराष्ट्र हे लक्षात ठेवेल. नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी आत्ममग्नता सोडून आत्मचिंतन करावे असे आम्ही सुचवत आहोत. त्यांना इतिहास घडविण्याची संधी होती, पण सर्व कालखंड थिल्लर राजकारणात घालवून श्री. मोदी यांनी महान संधी गमावली!

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सांगलीतील 9 हजारांवर शिक्षकांना धक्का, कागदपत्रांच्या पडताळणीनंतर आता ‘टीईटी’ची सक्ती; 52 वर्षांच्या आतील गुरुजींना द्यावी लागणार परीक्षा सांगलीतील 9 हजारांवर शिक्षकांना धक्का, कागदपत्रांच्या पडताळणीनंतर आता ‘टीईटी’ची सक्ती; 52 वर्षांच्या आतील गुरुजींना द्यावी लागणार परीक्षा
दोन महिन्यांपूर्वी नागपूरमध्ये ‘शालार्थ आयडी’ घोटाळा उघडकीस आल्यानंतर राज्यातील शिक्षकांच्या नियुक्तीची पडताळणी सुरू करण्यात आली होती. शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण...
कोल्हापूर महापालिका प्रभागरचनेवर 55 हरकती, 22 सप्टेंबरपर्यंत होणार सुनावणी
रसायनयुक्त बनावट देशी दारू बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, कराड शहर पोलिसांची कारवाई; 11 लाखांच्या मुद्देमालासह तिघांना अटक
पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे, कॉरिडॉर करून पर्यटनस्थळ बनवू नका; ऍड. जगदीश शेट्टी यांची मागणी
शक्तीपीठ महामार्ग अनावश्यक, राज्याला कर्जाच्या खाईत लोटणारा; न्यायालयात जाणार! – राजू शेट्टी
सोलापुरात आरक्षणासाठी बंजारा समाजाचा मोर्चा
सात जोडपी घटस्फोटाच्या उंबरठ्यावरून मागे फिरली, लोकअदालतीची यशस्वी शिष्टाई