डहाणूकरांच्या मणक्याला दणका, डहाणू-जव्हार राज्यमार्ग खड्ड्यांनी पोखरला
डहाणू येथून जव्हारपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मणक्याला रोजच दणके बसत आहेत. हा मार्ग खड्ड्यांनी अक्षरशः पोखरला असून या मार्गावरून प्रवासी रोजच जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठवूनही त्याकडे सरकारने सपशेल दुर्लक्ष केल्याने कुणाचा बळी गेला तरच या रस्त्याची दुरुस्ती होणार आहे का, असा संतप्त सवाल प्रवासी करीत आहेत.
सरकारकडे प्रस्ताव पाठवला
याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपकार्यकारी अभियंता नितीन पगारे यांना विचारले असता त्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध व्हावा याकरिता सरकारकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती दिली. काही दिवसांपूर्वी अनेक ठिकाणी तात्पुरत्या दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. मात्र निधी मिळाला की कायमस्वरूपी उपाययोजना केली जाईल, असेही पगारे यांनी सांगितले.
डहाणू-जव्हार या राज्य मार्गाची आधीच दुरवस्था झाली आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या धुवांधार पावसामुळे या मार्गावर असंख्य खड्डे पडले असून फक्त नावालाच रस्ता शिल्लक राहिला आहे. त्याचा त्रास प्रवाशांना सोसावा लागत आहे. या मार्गावरून रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सततचे हादरे बसत असल्यामुळे त्यांना मानेचे आणि कंबरेचे विकार जडत आहेत, असा संताप वाहनचालक रवींद्र बेंदर यांनी व्यक्त केला. या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे जीवाशी खेळ आहे. हा रस्ता लवकर दुरुस्त करा अन्यथा प्रवासी आणि वाहनचालकांच्या संतापाचा स्फोट होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List