मोदी सरकारचे देशभक्तीचे ढोंग उघडे पडले! उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला
‘अमित शहा यांचा मुलगा जय शहाच्या हट्टापायी पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळून मोदी सरकारने देशाच्या प्रतिमेचा चुराडा केला. मोदी सरकारचे आणि बोगस जनता पार्टीचे देशभक्तीचे ढोंग उघडे पडले आहे,’ असा जोरदार हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज चढवला. ‘पाकिस्तानबरोबर आपण खेळलो नसतो तर असं काय बिघडलं असतं, आम्ही खेळणार नाही असं मोदींनी कणखरपणे का सांगितलं नाही,’ असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
धाराशीवमधील शेकडो कार्यकर्त्यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी पत्रकार परिषदेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर सडेतोड भूमिका मांडली. ‘‘जगभरात शिष्टमंडळं पाठवून पाकिस्तान दहशतवाद पसरवतोय असं यांनी सांगितलं आणि आता त्याच देशाबरोबर क्रिकेट खेळत आहेत. पाकिस्तान तुमचा शत्रू आहे की मित्र? शत्रू असेल तर संबंध तोडा, तर जग तुमच्या मागे उभे राहील. नाहीतर जगाने विरोध करायचा आणि तुम्ही तिकडे जाऊन केक खायचा ही नीती देशाला घातक आहे,’’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
‘‘अमित शहा आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करत होते. त्यांच्या मुलाच्या हट्टापायी सामना झाला. त्यांचे बिंग आता फुटले आहे,’’ असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला. शिवसेनेच्या हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेटच्या विरोधातील भूमिकेवर टीका करणाऱ्यांचाही त्यांनी समाचार घेतला. ‘‘ज्यांना खुर्चीभक्ती, मोदीभक्ती, शहाभक्ती माहीत आहे, त्यांनी देश वगैरे हा शब्दही उच्चारू नये. फडतूस माणसं आहेत ती,’’ असा संताप त्यांनी व्यक्त केला.
देवाभाऊच्या जाहिरातीचा पंचनामा कोण करणार?
मराठवाडय़ातील पीक नुकसानीचे पंचनामे करून नंतर मदत देण्याच्या सरकारच्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी आसूड ओढले. ‘‘शेतीच्या नुकसानीचे पंचनामे जरूर करावेत, पण तातडीची सरसकट मदत शेतकऱयांना द्यायला हवी,’’ असे ते म्हणाले. ‘‘देवाभाऊ नावाने मुख्यमंत्र्यांनी करोडो रुपयांच्या जाहिराती केल्या आहेत. हे पैसे आले कुठून, दिले कोणी, कशासाठी जाहिरात केली. त्या जाहिरातीचा व तिच्या खर्चाचा पंचनामा कोण करणार? जाहिरातीचे करोडो रुपये शेतकऱ्यांना का मिळू नयेत, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
कर्ज काढून सण साजरा करण्याला विकास कसा म्हणायचा?
महाराष्ट्रावरील कर्जाच्या वाढत्या बोजावरून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्ला चढवला. ‘‘राज्याचं दिवाळं वाजलं तरी चालेल. कर्ज काढून दिवाळी साजरी करायची असा सरकारचा कारभार आहे. कर्ज काढून कंत्राटदारांच्या हितासाठी पुलाची, रस्त्याची कामे करणार असाल तर त्याला विकास कसा म्हणायचा,’’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ‘‘राज्यावर 9 लाख कोटींचे कर्ज झाले आहे. ते कसे फेडणार आणि कोण फेडणार? यातून बाहेर पडून प्रगती कधी करणार,’’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
धाराशीवमधील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत
धाराशिव जिह्यातील विविध पक्षांमधील शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील उपस्थित होते.
राज ठाकरे यांच्याशी युती होणार का?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी भेटीगाठी वाढल्याकडे पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले. त्यावरही त्यांनी भाष्य केले. ‘तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? गेलो तरी प्रॉब्लेम, नाही गेलो तरी प्रॉब्लेम. राज माझ्या वाढदिवसाला आला होता. गणपतीला त्यानं मला बोलावलं होतं. मी गेलो होतो. त्यावेळी मावशी बोलली होती, असाच येत राहा. आता खूप वर्षांनंतर हे येणं-जाणं सुरू झालं आहे,’ असे ते म्हणाले. मनसेशी युती होणार का असा प्रश्न विचारला असता, लवकरात लवकर, योग्य वेळी, असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले.
भूतकाळात मोदींनी अनेक घोषणा केल्या होत्या. शेतकऱयांची कर्जमाफी, 15 लाख रुपये, स्मार्ट सिटी, अच्छे दिन. ही सगळी भूतकाळातील घोषणांची भूतं आता त्यांच्या मानगुटीवर बसली आहेत.
मोदी माझे शत्रू नाहीत
नरेंद्र मोदी उद्या पंच्याहत्तरी साजरी करत आहेत याकडे लक्ष वेधले असता उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मोदी हे काही माझे दुश्मन नाहीत. ते मला दुश्मन मानत असतील, मी मानत नाही. मात्र ज्या पद्धतीने ते शिवसेना खतम करायला निघालेत, ते राजकारण आम्ही सहन करू शकत नाही. त्यांच्या मनात पाप असलं तरी त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांच्या हातून चांगला कारभार व्हावा.’
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List