घोडबंदर रोडवर चक्काजाम, वाहतूककोंडी; खड्ड्यांविरोधात रहिवाशांचा संताप
प्रचंड खड्डे, दररोजची वाहतूककोंडी आणि अवजड वाहनांची घुसखोरी याविरोधात घोडबंदरवासीयांनी आज चक्काजाम आंदोलन केले. या रोडवरील वाहतूककोंडी आणि खड्यांपासून सुटका मिळावी यासाठी पुन्हा स्थानिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. नागला बंदर भागात नागरिकांनी रास्ता रोको करून ठाणे महापालिका आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वाहतूककोंडी दूर होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ‘जस्टीस फॉर घोडबंदर रोड’ या संस्थेच्या वतीने करण्यात आला.
ठाणे महापालिका हद्दीतून जाणारा घोडबंदर रोड जेएनपीए बंदरातून वाहतूक करणाऱ्या आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनचालकांसाठी महत्त्वाचा आहे. तसेच मीरा-भाईंदर, वसई, विरार, पालघर भागातून ठाणे, नवी मुंबईत कामानिमित्त वाहतूक करणाऱ्या नोकरदारांसाठीदेखील महत्त्वाचा मार्ग आहे. घोडबंदर रोड परिसरात नागरीकरण वाढल्यामुळेही वाहतुकीचा भार वाढला आहे. त्यामुळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून वाहने चालवणे जिकिरीचे बनले आहे. त्यातच घोडबंदर रोडवर मेट्रोच्या कामामुळे वाहतूककोंडीत भर पडते.
रात्री बारानंतरच अवजड वाहनांना एण्ट्री मिळणार
नागरिकांचा संताप लक्षात घेऊन घोडबंदर रोडवर रात्री बारानंतरच अवजड वाहनांना एण्ट्री देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. वेळेआधी वाहने सोडणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत. अवजड वाहनांसाठी आच्छाड आणि चिंचोटी येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List