मीरा रोडला शिवस्मारकाशेजारी बेकायदा लॉज, तोडलेले बांधकाम पुन्हा उभे राहिलेच कसे? मराठा एकीकरण समितीचा आरोप
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम मराठी माणसांचे आराध्य दैवत. मात्र मीरा रोडमधील काशिमीरा नाका येथे असलेल्या पवित्र शिवस्मारकाच्या शेजारीच बेकायदेशीरपणे लॉज बांधला असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा केल्याने शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे दीड महिन्यापूर्वीच तोडलेले लॉजचे बांधकाम पुन्हा उभे राहिलेच कसे, असा सवाल मराठी एकीकरण समितीने केला आहे.
आंदोलनाचा इशारा
छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे पावित्र्य जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. परिसरातील बेकायदा धंद्यांमुळे अनेक प्रश्न निर्माण होत असून लवकरात लवकर पुन्हा उभा राहिलेला लॉज जमीनदोस्त करावा अन्यथा मोठे आंदोलन उभारू, असा इशारा मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी दिला आहे.
शिवस्मारकाच्या परिसरात कोणतेही अवैध धंदे होऊ नयेत याची काळजी मीरा-भाईंदर महापालिकेने घेणे आवश्यक होते. तसेच शिवस्मारकाच्या ठिकाणी चबुतरा बांधून तेथील पवित्र वास्तूचे सुशोभीकरण करण्याची मागणीदेखील मराठी एकीकरण समितीसह सर्वच राजकीय पक्षांनी केली होती. यासंदर्भात पालिका आयुक्त तसेच पोलीस आयुक्तांना अनेकदा निवेदनेही देण्यात आली. लॉजचे बांधकाम कोणी केले असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. त्यावर लवकरच हातोडा टाकला जाईल असे अतिक्रमण उपायुक्त कल्पिता पिंपळे यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List