बाईक टॅक्सी हा बेस्ट संपविण्याचा डाव, आदित्य ठाकरे यांचा घणाघाती आरोप
मुंबईत बाईक टॅक्सीच्या माध्यमातून बेस्टला संपविण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. भाजप सरकार आणि एसंशिं गटाकडून आपल्या डोळ्यादेखत मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या बेस्टला मारलं जात आहे, असा घणाघाती आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज केला.
मुंबईत बाईक टॅक्सी सुरू करण्यास कशा प्रकारे परवानगी देण्यात आली? यामागे परिवहनमंत्री व सत्ताधाऱ्यांचा नेमका काय हेतू आहे? याबाबत पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. बाईक टॅक्सी असो किंवा सिटीफ्लोसारख्या बसेस असतील, या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे खासगीकरण करून भाजप आणि एसंशिं गटाचे ट्रिपल इंजिन सरकार आपल्या पब्लिक ट्रान्सपोर्टला म्हणजे बीईएसटीला पूर्णपणे मारण्याचे काम करत आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
बेस्टची दरवाढ, बेस्टचे बदलते रुट आणि कमी होणारे रुट, बेस्ट बस डेपोंची बिल्डरांना होणारी विक्री एसंशिं गटाचे लोक करत आहेत. हे आंदोलन शिवसेना घरोघरी नेणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
मुंबईकरांची हक्काची बीईएसटी तुम्ही मारायला निघाला आहात. ज्या सिटीफ्लो बसेस चालू आहेत त्यातील किती कायदेशीवर व बेकायदेशीर सुरू आहेत याबाबतची आणि खोके कुठे कुठे चाललेत याचीही माहिती आमच्याकडे असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षेचे काय?
लाखो मुंबईकरांसाठी किती बाईक टॅक्सी तुम्ही रस्त्यावर आणणार आहात? बाईक टॅक्सीवाले कोण असणार? कुठून येणार? जे प्रवासी या सेवेचा वापर करणार त्या महिला-पुरुषांना संरक्षण असेल की नाही? सेफ्टीसाठी त्यांना हेल्मेट कोण देणार? नो एण्ट्रीमध्ये गाडी घालू नये यासाठी काही निर्बंध आहेत का? असा सवालही त्यांनी केला.
नेमका फायदा कुणाचा?
मुंबई महापालिकेत आणि बेस्टमध्ये गेली 25 वर्षे शिवसेनेची सत्ता असताना बीईएसटी फ्लॅट फेअर्सवर चालत होती. पाच रुपयांत पाच कि.मी. दहा रुपयांत दहा कि.मी., 15 रुपयांत 15 कि.मी. आणि 20 रुपयांत तुम्ही कुठूनही कुठेही जाऊ शकत होता, पण बीईएसटी मारायला भाजप आणि एसंशिंने जो डाव टाकला त्यामुळे पाच कि.मी अंतराला आता 10 रुपये, 20 कि.मी. 50 रुपये झाले आहे. शिवसेनेच्या सत्ताकाळात बेस्ट बसने पन्नास कि. मी. अंतराचा प्रवास 20 रुपयांत करता येत होता. आता याउलट बाईक टॅक्सीने दीड कि.मी अंतरासाठी 15 रुपये तुम्हाला द्यावे लागणार आहेत. नेमका यामध्ये फायदा कुणाचा? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
खुलेआम भ्रष्टाचार सुरू
विधिमंडळाचे अधिवेशन चालू असताना परिवहनमंत्र्यांनी बाईक टॅक्सीवर धाडी टाकण्याचा स्टंट केला. मग एका बाईक टॅक्सी कंपनीने प्रो-गोविंदाला मोठी स्पॉन्सरशिप दिली. एवढा खुलेआम भ्रष्टाचार सुरू आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
बेस्टला मदत का नाही?
बाईक टॅक्सीमधून काय साधणार आहे? बीईएसटीला तुम्ही का मदत करत नाही? बेस्टला बसेस वाढविण्याची आणि निधी देण्याची गरज आहे. ते देण्याचे सोडून परिवहनमंत्री डेपो विकण्याच्या मागे लागले आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List