रोखठोक – आता संभ्रम नको! गुंड टोळ्या, राजकीय खोजे काय्य करणार?
महाराष्ट्रात सध्या मराठी एकजुटीचे जोरदार वारे वाहत आहेत. मराठीच्या प्रश्नावर दोन ठाकरे एकत्र आले, ते राजकीयदृष्ट्याही यावेत हा मराठी माणसांचा रेटा अभूतपूर्व आहे. मुंबई, महाराष्ट्र, मराठी माणसाविषयी व्यापारी भाजपला प्रेम नाही. मराठी माणसांशी लढण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांतल्या गुंड टोळ्यांना भाजपमध्ये समाविष्ट केले, हे चित्र काय सांगते?
महाराष्ट्रात सध्या मराठी एकजुटीचे जोरदार वारे वाहत आहेत. उद्धव आणि राज ठाकरे 5 जुलै रोजी मराठी विजय सोहळ्यांत एकत्र आले. त्यानंतर लोकांनी ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा केला. मराठीवरील अन्याय सहन करणार नाही व त्यासाठी एकजुटीने लढण्याचा आत्मविश्वास मराठी लोकांत निर्माण झाला. दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे हा आत्मविश्वास निर्माण झाला हे खरे, पण त्यामुळे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे सर्व प्रश्न लगेच मार्गी लागले असे होत नाही. मराठी माणूस व त्याचे सर्व प्रश्न जेथच्या तेथेच आहेत. हिंदी सक्तीविरोधात दोन ठाकरे एकत्र आले, पण त्यांची राजकीय युती अद्याप जाहीर झाली नाही. ती युती होणे गरजेचे आहे. तरच महाराष्ट्राला नवी दिशा मिळेल. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मराठी एकजुटीचे वादळ निर्माण झाले ते पाहून दिल्ली आणि महाराष्ट्राचे सध्याचे सत्ताधारी हादरले आहेत. ही युती घडू नये यासाठी ते प्रयत्न करतील. मराठी एकजुटीच्या विजय मेळाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला विजेचे जोरदार धक्के बसले आहेत. त्याचे रूपांतर भूकंपाच्या जोरदार धक्क्यात होईल व आपले राज्य पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडेल याची सगळ्यांत जास्त भीती एकनाथ शिंदे व त्यांच्या बरोबरच्या लोकांना वाटते. ते बरोबर आहे. एकनाथ शिंदे हे चिंताग्रस्त होउढन लगेच दिल्लीत गेले. त्यांचे गुरू अमित शहांना भेटले. “महाराष्ट्रात सध्या जे घडते आहे ते थांबवा. फडणवीस यांना हे वादळ रोखता येणार नाही.” यावर अमित शहा यांनी विचारले, “काय करायचे?” त्यावर शिंदे म्हणाले, “मी माझ्या लोकांसह भाजपमध्ये येतो. मला मुख्यमंत्री करा. हे सर्व रोखण्याची गारंटी देतो.” शहा – शिंदे यांच्यात ही चर्चा झाली व अशी चर्चा झाल्याची चर्चा शिंदे गटात सुरू आहे. शिंदे गटाचे उदय सामंत, शिरसाट अशा प्रकारचे मंत्री विधानसभेत उघडपणे बोलत होते की, “शहा व शिंदे मिळून मराठी माणसांची एकजूट फोडतील. राज व उद्धव यांना एकत्र येऊ देणार नाहीत.” शिंदे यांचे मंत्री ही विधाने कशाच्या बळावर करतात? ठाकरे आपल्या दबावाखाली येतील या कल्पनेत कोणी असतील तर ते मूर्ख आहेत. कोणताही दबाव आता मराठी माणूस स्वीकारणार नाही. वरळीनंतर मीरा – भाईंदर येथे ज्या पद्धतीने मराठी एकजूट उसळली ही खदखद सर्वच पातळीवर आहे. मुस्लिम समाजाबद्दल एकेकाळी नव्हता त्यापेक्षा जास्त रोष मुंबई – महाराष्ट्रात गुजराती, जैन समाजाबद्दल उफाळून येत आहे. तो अमित शहांच्या महाराष्ट्रद्वेष्टय़ा राजकारणामुळे. हा संतापाचा लाव्हा आता महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हय़ात, शहरात बाहेर पडेल असेच चित्र आहे.
वेगळ्यां भूमिका
वरळीच्या विजयी मेळाव्यानंतर भाजप व शिंदे गटाच्या प्रवक्त्यांच्या भूमिका मनोरंजक आहेत. राज ठाकरे यांची भूमिका मराठीबाबत एकदम योग्य, पण उद्धव ठाकरे यांच्या त्याच भूमिकेवर दोघांनी टीका केली. ती टीका सुरूच आहे. राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यातून निर्माण झालेली ही पोटदुखी सरळ दिसते. एक कार्यक्रम, एक मंच. दोन भाऊ एकत्र आले, त्यात एक बरा व दुसरा चुकीचा असे बोलणारे स्वतःच्याच अब्रूचे धिंडवडे त्या दिवशी काढत होते. मीरा-भाईंदर येथे व्यापाऱ्यांच्या मुजोरीविरुद्ध मराठी लोकांनी प्रचंड मोर्चा काढला. त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी गेलेले मंत्री प्रताप सरनाईक यांना लोकांनी पळवून लावले. या मोर्चाच्या गर्दीत व आयोजनात शिवसेना होती, पण मुख्यमंत्री फडणवीस ‘मनसे’चे नाव घेत राहिले व शिवसेनेचे नाव घेण्याचे टाळले. त्यामागचा कावा अनाजीपंतांचा आहे व तो दोन्ही ठाकऱ्यांनी समजून घेतला पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या व्यक्तीचे मन साफ नाही, हेच त्यातून दिसले. आपण राज्याचे मुख्यमंत्री झालो म्हणजे या राज्यातील लोकांना सर्व तऱ्हेची अक्कल शिकविण्याची परवानगी आपल्यालाच मिळाली अशा थाटात ते रोज बोलत असतात. पुन्हा त्यांचे बोलणे वकिली पद्धतीचे असते. हे वकील कसे? न्यायमूर्ती खिशात व दबावाखाली असल्यामुळेच यांची वकिली (फिक्सिंग) सध्या चालली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांना खरोखरच प्रेम आहे, असे गृहीत धरले तरी त्यांचे हे प्रेम या राज्यातील मराठी माणसांना खरे वाटत नाही हे त्यांना माहीत आहे काय? कधीकाळी हेच फडणवीस ‘विदर्भ हेच माझे राज्य’ असे फलक घेऊन नागपुरात आंदोलन करीत होते हे लोक विसरलेले नाहीत. मराठी माणूस, मराठी एकजूट हा देखावा त्यांनी ते आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत म्हणून उभा केला आहे. फडणवीस यांनी मनोज जरांगे-पाटील यांचे मराठा आंदोलन पद्धतशीर संपवले व छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेऊन ओबीसींनाही थंड केले. याच काव्याने हे महाशय मराठी एकजुटीलाही खिंडार पाडतील असे त्यांचेच लोक उघडपणे बोलू लागले आहेत.
शिंदे, फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी चहापानासाठी जातात. राज ठाकरे त्यांचे स्वागत करतात. शिंदे यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान औटघटकेच्या फौजदारासारखे आहे. फडणवीस हे राज ठाकरे यांना भेटून राजकीय हवा गरम करतात. शिंदे यांचीच हवा सध्या संपल्याने त्यांच्या भेटीगाठी फुसक्या आहेत व या दोघांमुळे सध्याची मराठी एकजूट संपेल असे वाटत नाही. एक दिवस स्वतः राज ठाकरेच समोर येऊन या सगळ्यांवर बोलतील आणि संभ्रम दूर करतील हे नक्की.
मराठी उडेल
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली मराठी एकजूट टिकली नाही तर काय होईल? या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट आहे. मुंबई पूर्णपणे अदानी-लोढा वगैरेंच्या घशात जाईल व एक दिवस मुंबई महाराष्ट्रात राहणार नाही. भाजपचा एक खासदार निशिकांत दुबे दिल्लीत बसून मराठी माणसाला भिकारी म्हणतो व मारण्याची धमकी देतो ती कशाच्या जोरावर? आज फूटपाथवरच्या झोपडीवाल्यास आणि धारावीकरांना जसे उडविले जाते आहे तसे तुम्हाला, आम्हाला उद्या उडविले जाईल. गिरगाव, परळ, शिवडी, दादर, विलेपार्ले, मुलुंड, अंधेरी या लढाईत केव्हाच पडले आहे. लोढा यांचे टावर्स अलिबाग आणि मांडव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर उभे राहिलेले दिसत आहेत. उद्या सध्याचे मुख्यमंत्री आपले मंत्रालय अलिबाग, उरणला नेऊन अटल सेतूचा सदुपयोग करणार आहेत. कारण भाजपला मुंबई ही परप्रांतीय पैसेवाल्यांची रखेल करायची आहे. वैभव नाईक भेटायला आले. सिंधुदुर्गातील सर्व मोक्याच्या जमिनी गुजरातच्या दलालांनी ताब्यात घेतल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शिवरायांचा रायगडही मराठी राहिलेला नाही. आता काय करायचं? मुंबईतील गिरणी कामगारांचा लढा सुरूच आहे. त्यांना बदलापूरच्या पुढे वांगणी, शेलू अशा गावांत ढकलले, तेथे घरे दिली. मुंबईतील धारावी, मिठागरे, वांद्रे रेक्लमेशन, दहिसर, मुलुंड टोलनाका, मदर्स डेअरीपासूनचे सर्व भूखंड, जमिनी अदानी या एकाच माणसाकडे. आता गोरेगावचे मोतीलाल नगरही अदानीने मिळवले. या सगळ्यांत गिरणी कामगार, मराठी माणूस कोठे आहे? ही सर्व भाजपची गुंतवणूक अदानी सांभाळत आहे. एकनाथ शिंदेंना त्यांचा वाटा मिळतो. त्यामुळे दाढीला रंग लावून ते गप्प आहेत. पुन्हा त्याच अदानीच्या पैशांवर ‘ठाकरे एकत्र कसे येतात ते पाहतो,’ अशी मस्तवाल भाषा सुरू आहे.
गुंडांच्या टोळ्यां
मराठी माणसाला सगळ्यांत आधी मुंबई, ठाण्याची लढाई लढावी लागेल. भ्रष्टाचाराच्या पैशांतून मराठी माणसाचा पराभव या दोन्ही शहरांत घडवायचा व मराठी अस्मितेचा शेवटचा खिळा ठोकायचा हे ठरलेले आहे. भारतीय जनता पक्षाला संयुक्त महाराष्ट्र, अखंड महाराष्ट्र, मराठी अस्मिता या सगळ्यांशी घेणे-देणे नाही. तसे ते कधीच नव्हते. आधी मुंबईची लूट करायची, मग मुंबई केंद्रशासित करायची. त्यानंतर स्वतंत्र विदर्भाचा डाव टाकून महाराष्ट्राचे अस्तित्व नामशेष करायचे हे भाजपचे उघड धोरण आज दिसते. याविरोधात उठाव झाला तर तो रोखण्यासाठी गुंडांच्या सर्वपक्षीय टोळ्यां भाजपमध्ये सामील करून घेतल्याच आहेत. फडणवीस, शिंदे, अजित पवार यांचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत. त्यामुळे ते आज एकत्र आहेत. याच आर्थिक हितसंबंधांमुळे त्यांनी मराठी माणसाचा विषय वाऱ्यावर सोडला. मराठीसाठी लढणाऱ्यांना उद्या हे शहरी नक्षलवादी ठरवतील. त्यासाठीच त्यांनी जनसुरक्षा कायदा आता आणला आहे.
लढवय्या मराठी जनतेला मोगल काळातील ‘खोजे’ बनवण्याचा उपक्रम सुरू आहे. राज्यावर ‘खोजे’ मंडळींचेच राज्य आहे. या खोज्यांना मराठी माणसांची एकजूट नको, ठाकरे बंधूंनी एकत्र येणेही नको. हे सर्व व्यापाऱ्यांचे मनसुबे उधळले जातील. महाराष्ट्राचे पुण्य आणि 106 हुतात्म्यांचा त्याग कामी येईल!
Twitter – @rautsanjay61
Gmail – [email protected]
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List