बेळगावातील कन्नड सक्तीच्या विरोधात मराठी भाषिक रस्त्यावर उतरणार!
कन्नड अंमलबजावणी प्राधिकरणाकडून सीमाभागात कन्नड सक्तीला सुरुवात केली आहे. बेळगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौरांच्या वाहनांवरील नामफलक आणि नंबरप्लेट मराठी, इंग्रजीमधून काढून फक्त कन्नड भाषेत लावण्यात आली आहे. भगवा झेंडाही उतरविण्यात आला आहे. केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार करूनही होत असलेल्या या कन्नड सक्तीविरोधात आता मराठी भाषिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. सीमाभागात मराठी बहुभाषिक मतदारसंघातून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना भेटून याबाबत चर्चा करण्यासह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारीही मराठी भाषिकांकडून केली जात आहे.
कन्नड सक्तीच्या फतव्याविरोधात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक जत्तीमठ येथे झाली. अध्यक्षस्थानी युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके होते. कन्नड प्राधिकरणाच्या झालेल्या बैठकीत मराठीसह इतर भाषा काढून फक्त कन्नड भाषेचे फलक सर्व सरकारी ठिकाणी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी धनंजय पाटील, मनोहर हुंदरे, अशोक घगवे, चंद्रकांत पाटील, शिवाजी मंडोळकर, नारायण मुंचडीकर, विजय जाधव, प्रवीण रेडेकर, राजू पाटील, सुधीर शिरोळे, रमेश माळवी, बाबू पावशे, रामनाथ मुंचडीकर, जोतिबा चौगुले, आकाश कडेमनी आदी उपस्थित होते.
सीमाभागात आंदोलनाची जोरदार तयारी
सीमाभागातील मराठी बहुभाषिक भागातून निवडून येणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधींना, तसेच महापौरांना भेटून कन्नड सक्ती थांबविण्यासाठी निवेदन देण्याचे ठरले. शिवाय राष्ट्रीय पक्षातील मराठी भाषिकांनी मराठी भाषेवर अन्याय होताना त्याविरोधात आवाज उठवावा, असे आवाहनही करण्यात आले. ही कन्नड सक्ती थांबविली नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List