मियाँसाहेब दर्ग्याची वक्फ बोर्डामध्ये नोंद, टाकळीमियाँ ग्रामस्थांच्या बैठकीत तीव्र पडसाद
तालुक्यातील टाकळीमियाँ येथील ग्रामदैवत मियाँसाहेब बाबा दर्ग्याची गावातील काही मुस्लिम नागरिकांनी वक्फ बोर्डामध्ये नोंद केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत ग्रामस्थांच्या बैठकीत तीव्र पडसाद उमटले.
टाकळीमियाँ ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांची विशेष बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत गावातील काही मुस्लिम व्यक्तींनी देवस्थानची नोंद थेट वक्फ बोर्डात केल्याचे उघड झाल्यामुळे गावातील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. वक्फ बोर्डाकडे नोंदणी कोणाच्या परवानगीने केली? गावात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न का करण्यात आला? असे सवाल मुस्लिम समाजातील ठराविक लोकांना बैठकीत विचारण्यात आले. तेव्हा देवस्थानच्या सालावरून निर्माण झालेल्या वादामुळे असे पाऊल उचलल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.
ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तर देताना संबंधित मुस्लिम नागरिकांनी आपल्याकडून झालेली चूक मान्य करून 500 रुपयांच्या स्टॅम्पवरून नोंदणी मागे घेण्याचा लेखी शब्द दिला आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मुस्लिम समाजातील अंतर्गत वादाचा गावच्या परंपरेशी कुठलाही संबंध नाही. परंपरेनुसार ग्रामदैवताची सेवा सन्मानपूर्वक व्हावी. या बैठकीला डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी व्हाइस चेअरमन श्यामराव निमसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश निमसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे, सरपंच लीलाबाई गायकवाड, उपसरपंच सुवर्णा करपे, ज्ञानदेव निमसे, सुभाष करपे, राजेंद्र करपे व ग्रामस्थ उपस्थित होते.
मियाँसाहेब देवस्थान ट्रस्टवर गावातील सर्व समाजांच्या नागरिकांची नेमणूक करण्यात येणार आहे. देवस्थानबाबत जे काही निर्णय घ्यायचे ते ग्रामस्थांची बैठक आयोजित करून या ट्रस्टमार्फत घेण्यात येतील, असा ठराव सर्वानुमते करण्यात आला. या विषयावर विशेष ग्रामसभा घेऊन देवस्थानबाबत निर्णय घेण्यात येईल. – लीलाबाई गायकवाड, सरपंच, टाकळीमियाँ
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List